मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांच्यामध्ये चर्चासत्र झाले. आयपीएल सामन्यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी चित्रपट प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. त्यावेळी कपिल देव यांनी अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारले. यामध्ये कपिल देव यांनी अमिताभ यांना आयपीएलमधील आवडता संघ कोणता ? असा प्रश्न विचारला, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांना हसत उत्तर दिलं.
आयपीएलमध्ये आपला आवडता संघ कोलकाता असल्याचे अमिताभ बच्चन यांनी या चर्चेदरम्यान सांगितले. यावेळी ते म्हणाले की, मी नेहमीच कोलकाता संघाला पाठिंबा देत आलो आहे. कोलकाता संघाला पाठिंबा देण्याचे कारणही यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले, मी कोलकात्याचा जावई आहे त्यामुळं मी या संघाला नेहमी सपोर्ट करत असतो असे ते यावेळी हसत म्हणाले.
त्याचप्रमाणे शाहरुख खान या संघाचा मालक आहे. माझे आणि शाहरुख खानचे संबंध चांगले आहेत. आमच्या दोघांची मैत्री आहे. हेही कोलकाता संघाला सपोर्ट करण्याचे एक कारण असू शकते असे यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले. पुढे ते म्हणाले, कोलकाता संघात जिंकण्याची क्षमता खूप आहे. संघातील सर्व खेळाडू एखाद्या योध्याप्रमाणे मैदानात उतरतात आणि विजयासाठी सर्वस्व पणाला लावतात म्हणून मी नेहमीच या संघाचा चाहता राहिलो आहे.
अमिताभ बच्चन '102 नॉट आउट' या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते. ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात अमिताभ 102 वर्षाच्या वडिलांची आमि ऋषी कपूर 75वर्षाच्या मुलाची भूमिका करत आहेत.