नवी दिल्ली : भारताचा फिरकीपटू आर. अश्विनकडे आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या निर्णयावर काही जणांनी नाकं मुरडली होती. पण हा निर्णय योग्य आहे आणि मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागने तो घेतला आहे, असे मत संघाचे मालक मोहित बर्मन यांनी व्यक्त केले आहे.
आयपीएलच्या अकराव्या हंगामाला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आतापर्यंत पंजाबच्या संघाला आयपीएलमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कर्णधार बदलला तर संघाची कामगिरी बदलू शकते, असे त्यांच्या संघ व्यवस्थापनाला वाटत असावे. त्यामुळेच त्यांनी अश्विनकडे संघाची धुरा सोपवली आहे.
आयपीएलमध्ये यापूर्वी बरीच वर्षे अश्विन हा चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना अश्विनने संघाच्या जेतेपदांमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. तब्बल दोन वर्षांनी या हंगामात चेन्नईच्या संघाचे पुनरागमन झाले. त्यावेळी धोनी अश्विनला आपल्या संघात कायम ठेवेल, असे वाटले होते. पण चेन्नईच्या संघाने अश्विनला संघात घेणे टाळले. या गोष्टीचा फायदा पंजाबने घेतला आणि 7.8 कोटी रुपये मोजत त्यांनी अश्विनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
" ब्रॅड हॉज आणि सेहवाग यांनी दोघांनी मिळून अश्विनला संघात घेण्याचा निर्णय घेतला होता. पण संघाचा कर्णधार कोण असेल, यावर बरीच चर्चा सुरु होती. त्यावेळी सेहवागने अश्विनचे नाव कर्णधार म्हणून सुचवले, " असे बर्मन यांनी सांगितले.