नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथला अजून एक जोरदार धक्का बसू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे आणि आयपीएलमधील राजस्थान रॉयलचे कर्णधारपद स्मिथने गमावले आहे. काही प्रसारमाध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार स्मिथला आयपीएलमधूनही डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टीवन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना अनुक्रमे कर्णधार आणि उपकर्णधार या पदावरुन उचलबांगडी केली आहे. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. पण आता त्यांच्यासाठी आयपीएलचे दारही बंद होऊ शकते.
राजस्थानच्या संघाचे कार्यकारी अधिकारी रणजित बरठाकूर यांनी याबाबत म्हटले आहे की, " दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली. त्यानंतर स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कारवाई करण्यात आली. आता आम्ही बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पाहत आहोत."
राजस्थानचा संघ दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्यांना आता कोणतीही जोखीम घ्यायची नाही. त्यामुळे बीसीसीआय नेमका काय निर्णय घेते, याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राजस्थानच्या संघाने स्मिथची कर्णधारपदावरून उचलबांगडी केली आहे. स्मिथच्या जागी अजिंक्य रहाणेकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.