नवी दिल्ली : किंग्ज इलेव्हन पंजाबच्या लोकेश राहुलने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध रविवारी खेळताना आयपीएलमधले सर्वात जलद अर्धशतक झळकावले. क्रिकेट विश्वाने राहुलचे यावेळी कौतुक केले. पण त्याच्या या जलद अर्धशतकामागे ' हा ' एक धडाकेबाज फलंदाज आहे. हा फलंदाज नेमका कोण, ते जाणून घ्या...
पंजाबचा पहिला सामना त्यांच्या घरच्या मैदानात म्हणजे मोहालीमध्ये झाला होता. दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना राहुलने पंजाबकडून सलामीला येत 14 चेंडूंत अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. यापूर्वी आयपीएलमध्ये 15 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम होता. राहुलकडून यापूर्वी अशी झंझावाती फलंदाजी पाहायला मिळाली नव्हती. पण त्याच्या फलंदाजीमध्ये हा बदल झाला कसा आणि तो कुणी घडवला, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. राहुलच्या फलंदाजीमध्ये जो आक्रमकपणा आला तो वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलकडून, दस्तुरखुद्द राहुलनेच ही गोष्ट सांगितली आहे.
याबाबत राहुल म्हणाला की, " रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत असताना मी गेलची फलंदाजी पाहत होतो. बऱ्याच वेळा त्याच्याशी फलंदाजीबाबत चर्चाही केली. आक्रमक फलंदाजी करण्यासाठी त्याने मला मार्गदर्शन केले. मी दिल्लीविरुद्ध जे जलद अर्धशतक झळकावले, त्याचे श्रेय मी गेलला देईन. कारण त्याने जर मार्गदर्शन केले नसते तर मी अशी खेळी साकारू शकलो नसतो. "