नवी दिल्ली : आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाची मालकिण प्रीती झिंटा आणि मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवाग यांच्यातील भांडण आता चव्हाट्यावर आले आहे. पण प्रीतीनंतर आता सेहवागनेही आमच्यामध्ये कोणतेच भांडण नसल्याचे म्हटले आहे.
" प्रीती आणि माझ्यामध्ये कसलेच भांडण नाही. आमच्यामध्ये भांडण असल्याचे जे वृत्त प्रकाशित करण्यात आले ते निराधार आहे. या वृत्ताला कसलाच आधार नाही. हे वृत्त खोडसाळपणाचे आहे, " असे सेहवागने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.
प्रीती झिंटाने असा केला खुलासा
काय आहे प्रकरण आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धचा पराभव किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकिण प्रीती झिंटाच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. कारण या पराभवानंतर तिने थयथयाट करत संघाचा मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागशी कडाक्याचे भांडण केले होते. या भांडणानंतर सेहवाग चांगलाच दुखावला गेला असल्याचे म्हटले जात आहे. या पराभवानंतर प्रीतीने मैदानात सर्वांसमोर सेहवागला खडे बोल सुनावले होते. प्रीती संघ व्यवस्थापनात ढवळाढवळ करत असल्यामुळे सेहवागही तिच्यावर चांगलाच नाराज होता. पण सर्वासमोर सेहवाग काहीच बोलला नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेहवागला प्रीती डोईजोड होत असल्याचे समजते, त्यामुळे तो आता या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार असल्याचेही म्हटले जात आहे.