मुंबई: गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली डेयरडेविल्सनं शुक्रवारी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. गोलंदाजांच्या अचूक आणि शिस्तबद्ध माऱ्यामुळे दिल्लीनं चेन्नईला 34 धावांनी पराभूत केलं. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी एक वेगळाच किस्सा घडला. त्यामुळे चेन्नईचा कर्णधार धोनीला हसू आवरता आलं नाही. नाणेफेकीवेळी चेन्नईचा कर्णधार धोनी आणि दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासोबत न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सिमॉन डॉल उपस्थित होते. त्यांनी श्रेयस अय्यरच्या हातात नाणं दिलं. हे नाणं श्रेयसनं असं काही हवेत उडवलं, की ते फार दूर जाऊन पडलं. हे दृश्य पाहून धोनीला हसू आवरणं अशक्य झालं. हे दृश्य पाहून धोनीच काय, समालोचकही हसू लागले. धोनीला हसताना पाहून श्रेयसही हसू लागला. धोनीनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. खरंतर, श्रेयसही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्यास उत्सुक होता. मात्र नाणेफेक हरल्यानं दिल्लीला प्रथम फलंदाजी करावी लागली. दिल्लीचा संघ नाणेफेक जिंकण्यात अपयशी ठरला असला, तरी सामना जिंकण्यात त्यांना यश आलं.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीनं 20 षटकांमध्ये 162 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला चेन्नईच्या संघाला 128 धावाच करता आल्या. चेन्नईकडून अंबाती रायूडूनं अर्धशतकी खेळी साकारली. तर रविंद्र जाडेजानं नाबाद 27 धावा केल्या. अपेक्षित धावगती न राखता आल्यानं चेन्नईला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी विजय शंकर (नाबाद 36 धावा) आणि हर्षल पटेल (नाबाद 36 धावा) यांच्या सहाव्या विकेटसाठी अवघ्या 32 चेंडूंमध्ये 65 धावा चोपून काढल्यानं दिल्लीनं 162 धावा केल्या.