मुंबई : शेन वॉटसन... दुखापतग्रस्त असताना तुफानी फटकेबाजी करतो काय, शतक झळकावतो का, चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद एकहाती जिंकवून देतो काय... सारे काही अविस्मरणीय असेच. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत वॉटसनने नाबाद 117 धावांची साकारली. त्यावेळी बऱ्याच जणांनी त्याला डोक्यावर घेतलं. पण त्याच्या या शतकी खेळीचं ' टुकुटुकु ते बुमबुम ' असेच वर्णन करता येईल.
अंतिम फेरीत हैदराबादने जेव्हा 178 धावा केल्या तेव्हा चेन्नई हा सामना जिंकू शकत नाही, असे बऱ्याच जणांना वाटले होते. कारण गोलंदाजी हे हैदराबादचे बलस्थान आहे, हे सर्वांनाच माहिती होते. त्यामुळे पहिल्या डावानंतर काही जणांनी हैदराबादला आयपीएलचे जेतेपद बहालही केले होते. पण त्यांना वॉटसनच्या धडाकेबाज फटक्यांचा अदमासही नव्हता.
हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी वॉटसन पहिल्या षटकात भुवनेश्वर कुमारचा सामना करायला सरसावला. पण भुवनेश्वरने ज्यापद्धतीने भेदक मारा केला, त्याला वॉटसनकडे काहीच उत्तर नव्हतं. कारण त्याचा पहिल्या सहा चेंडूंवर वॉटसनला एकही धाव करता आली नव्हती. त्यावेळी बऱ्याच जणांनी वॉटसनला शिव्यांची लाखोही वाहिली. वॉटसनला तब्बल पहिल्या दहा चेंडूंमध्ये एकही धाव करता आली नव्हती, तेव्हा त्याची टुकुटुकु फलंदाजी पाहून बऱ्याच जणांना त्याला राग आला होता. पण त्यानंतर वॉटसनने जो फटक्यांचा दांडपट्टा सुरु केला ते पाहिल्यावर बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या. स्थिरस्थावर झाल्यावर वॉटसनच्या फलंदाजीचा आलेख उंचावत गेला. संदीप शर्माच्या तेराव्या षटकात त्याने ज्यापद्धतीने 27 धावा काढल्या, ते पाहिल्यावर वॉटसन हा कोणत्या दर्जाचा फलंदाज आहे, हे कळून चुकलं. वॉटसनने 51 चेंडूंत शतक पूर्ण केले. यंदाच्या आयपीएलमधले त्याचे हे दुसरे शतक होते. आपल्या नाबाद 117 धावांच्या खेळीत त्याने 11 चौकार आणि आठ षटकारांची बरसात केली. आयपीएलच्या अंतिम फेरीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वॉटसनने आपल्या नावावर केला आहे.