Join us  

IPL 2018 : मालकीणबाई, हे वागणं बरं नव्हं; तुम्ही जरा शांत राहायला हवं!

मालकिण बाई (प्रीती झिंटा) तुमचं हे वागणं बरं नव्हं, असंच दर्दी क्रिकेट चाहत्याच्या मनात भावना आहेत.

By प्रसाद लाड | Published: May 12, 2018 10:28 AM

Open in App

एखादी गोष्ट सर्वांसमोर करायची. त्याबाबतीत काही छापून आलं, की ते वृत्त निराधार असल्याचं म्हणायची सध्या फॅशनंच आली आहे. प्रीती झिंटा आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यातील भांडणाचं प्रकरणही तसंच. आग लागल्याशिवाय धूर येत नाही, म्हणतात ते बरोबरच. जे घडलं ते साऱ्यांनी पाहिलं. त्यामुळे मालकिण बाई (प्रीती झिंटा) तुमचं हे वागणं बरं नव्हं, असंच दर्दी क्रिकेट चाहत्याच्या मनात भावना आहेत.

सामन्यात हार-जीत व्हायचीच. एखादा संघ जिंकायचा आणि दुसरा हरायचा. तुमच्या किंग्ज इलेव्हन पंजाबला तसे पराभव काही नवीन नाहीत. आतापर्यंतच्या दहा हंगामांमध्ये तुम्ही बऱ्याचदा पराभूत झालात. या दहा वर्षात तुम्ही किती वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचलात, हे तुम्ही सांगू शकाल का? राजस्थानविरुद्धचा पराभव तुमच्या फारच जिव्हारी लागला म्हणे. पण यापूर्वीच्या पराभवांची बोच तुम्हाला कधीच लागली नाही का? एक गोष्ट समजू शकतो, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात तुमच्या भावना गुंतल्या असतील. एका संघाची मालकिण म्हणून तसं असणं गैरही नाही. पण पराभवानंतर जे तुम्ही केलंत, त्याला कोणताही क्रिकेट चाहता तुम्हाला क्षमा करणार नाही.

पराभवानंतर तुम्ही मैदानात साऱ्यांसमोर तमाशा केलात. संघाचे मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवाग यांना तुम्ही अद्वातद्वा बोलतात. हे कितपत योग्य आहे. तुम्हाला क्रिकेटचा कितपत अनुभव, कधी बॅट तरी तुम्ही हातात पकडली का? आणि थेट शाळा घेता ती मुलतानचा सुलतान ठरलेल्या सेहवागची. निवृत्तीनंतरही चाहते त्याला विसरलेले नाहीत. कारण त्याची फलंदाजी होतीच तशी बिनधास्त. त्याला गोलंदाजी करायला जगातल्या सर्वच गोलंदाजांना धडकी भरायची. अशा एका महान फलंदाजाला तुम्ही आता क्रिकेट शिकवणार आहात का? या सामन्यात काही प्रयोग केले असतील सेहवागने, पण ते करायलाच हवेत. प्रयोग केले नसते तर सनथ जयसूर्यासारखा धडाकेबाज फलंदाज क्रिकेट जगताला पाहता आला नसता. पण ते तुमच्या गावीही नसेल. क्रिकेट कशाबरोबर खातात, हे तरी तुम्हाला माहिती आहे का?  लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण, अशी तुमची गत झाली आहे. 

तुम्हाला तिथल्या तिथे सेहवाग उलट बोलू शकला असता, पण सेहवाग तसे कधीच करणार नाही. कारण त्याच्यावर तसे संस्कार आहेत. त्याने गोलंदाजाला फटक्यांच्या माध्यमातून तोडीस तोड उत्तर दिले आहे, हे सारेच जाणतात. पण त्याने भांडण केल्याचे किंवा कुणाला सुनावल्याचे ऐकिवातही नाही. आदर हा कमवायचा असतो, तो पैशांनी विकत घेता येत नाही, हे तुम्ही विसरलात. मी संघ मालकिण, म्हणजे कुणाला काहीही बोलू शकते, हा गंड तुमच्या मनात होता. पैशांच्या जोरावर तुम्ही संघातील व्यक्तींची सेवा घेत आहात, त्यांना तुम्ही विकत घेतलेले नाही, हे लक्षात असू द्या. यापुढे तरी आपण कुणाशी आणि कुठे बोलत आहात, याचे भान असूद्या. नाहीतर तो सेहवाग होता म्हणून तुम्ही वाचलात, नाहीतर दुसरा कुणी असला असता तर तुम्ही संघाची मालकिण असल्याचं तोदेखील विसरू शकला असता. त्यामुळे जरा जपूनंच...

टॅग्स :आयपीएल 2018प्रीती झिंटाविरेंद्र सेहवाग