मुंबई : आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला जिंकण्यासाठी अखेरच्या षटकांमध्ये 19 धावांची गरज होती. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आणि बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खूष होता. आपला संघ आता जिंकणार हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होतं. पण अखेरच्या षटकात विनय कुमारने 19 धावा दिल्या आणि त्यानंतर तो समाजमाध्यमांवर ट्रोल व्हायला लागला.
एका चाहत्याने तर ट्विटरवर चेन्नईच्या मैदानात अखेरचे षटक टाकताना विनय कुमारने सामने कसे गमावले आहेत, याची आकडेवारी मांडली आहे. यामध्ये त्याने 2012 साली झालेल्या सामन्याचे उदाहरण दिले आहे. त्यावेळी चेन्नई आणि बंगळुरु यांच्यातील अखेरच्या सामन्यात चेन्नईला विजयासाठी 17 धावांची गरज होती. त्यावेळीही विनय कुमारने अखेरच्या षटकात 17 धावा दिल्या होत्या.
एका चाहत्याने तर अमिताभ बच्चन यांच्या एका फोटोमध्ये विनय कुमारचा चेहरा लावला आहे.
चाहत्यांनी ट्रोल केल्यावर विनय कुमारने याबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे. याबाबत तो म्हणाला की, " फक्त एका गोष्टीमुळे तुम्ही टीका करू नका. बंगळुरुला एका षटकात 9 धावांची गरज होती, तेव्हा मी अचूक मारा करत संघाला सामना जिंकून दिला होता. त्यानंतर मुंबईला एका षटकात 10 धावांची गरज होती, त्यावेळी मी भेदक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता. काही वेळा चांगल्या गोष्टी घडत नाहीत. "