बेंगळुरूः आयपीएल-११मध्ये 'करो-मरो'ची लढाई लढणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना जिंकून चाहत्यांची मनं जिंकली असली, तरी कर्णधार विराट कोहलीनं पंचांशी हुज्जत घालणं क्रिकेटप्रेमींना खटकलंय. कॅप्टन कोहलीचं हे वागणं अखिलाडूपणाचं आणि कर्णधाराच्या प्रतिमेला शोभणारं नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.हैदराबादचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सनं उमेश यादवचा एक चेंडू हवेत उडवला होता. डीप स्क्वेअर लेगला टीम साउदीनं पुढे झेपावत हा झेल भन्नाट टिपला. पंचांनी हेल्सला बाद दिलं होतं, पण थर्ड अंपायरचा कौलही त्यांनी मागितला होता. तेव्हा, कॅमेरा फुटेज बारकाईने पाहिलं असता, झेल घेताना चेंडूचा मैदानाला स्पर्श झाल्याचं दिसत होतं. त्यामुळे थर्ड अंपायरनं हेल्सला नाबाद ठरवलं. हा निर्णय रॉयल चॅलेंजर्ससाठी अनपेक्षित होता. पण, तो खेळाडूंनी स्वीकारला. एकट्या विराट कोहलीला तो शांतपणे पचवता आला नाही. तो पंचांकडे जाऊन तावातावाने आपल्या भावना करताना दिसला. हे दृश्य विराटच्या चाहत्यांनाही फारसं रुचलं नाही. तिसऱ्या अंपायरने सर्व बाजूंनी फुटेज तपासून कौल दिला असताना त्यावर आक्षेप घेणं कितपत योग्य होतं?
विराट कोहली आक्रमक आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. महेंद्रसिंग धोनी जितका 'कूssल' आहे, तितकाच विराट तापट आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असू शकतो. पण, आक्रमक असणं वेगळं आणि अशा पद्धतीने पंचांशी हुज्जत घालणं वेगळं. विराट कोहली टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. अजून बराच लांबचा पल्ला त्याला गाठायचा आहे. भारतीय संघाला 'अच्छे दिन' दाखवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्यात आक्रमकपणासोबतच नम्रपणाही अत्यंत गरजेचा आहे. कारण, विराटला 'फॉलो' करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्या दृष्टीने विराटला अजून प्रगल्भ होण्याची गरज असल्याचं कालच्या प्रकारावरून पुन्हा जाणवलं. दरम्यान, शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सनं हैदराबादचा १४ धावांनी पराभव केला आणि आपल्या प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या.