Join us  

कोहलीच्या नावे विराट विक्रम, रैनाला टाकले मागे

विराटने हा विक्रम करताना रैनापेक्षा 10 सामने कमी खेळले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 8:03 AM

Open in App

मुंबई - बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने सुरेश रैनाचा विक्रम मोडला आहे.  विराटनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं या सामन्यात 32 वी धाव घेऊन रैनाचा विक्रम मोडला आहे. हा विक्रम विराटने त्याच्या 153 व्या सामन्यात केला आहे. त्याने हा विक्रम करताना रैनापेक्षा 10 सामने कमी खेळले आहेत. 

सुरेश रैनानं आयपीएलच्या 163 सामन्यांमध्ये 4558 धावांचा रतीब घातला होता. विराट कोहलीनं 153 व्या सामन्यात हा विक्रम मोडला.  त्यामुळं त्याच्या नावावर आता 153 सामन्यांमध्ये 4619 धावांचा इमला उभा राहिला आहे. त्यात 4 शतकं आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या मोसमातही विराट कोहली 4 सामन्यांमध्ये 201 धावा करून आघाडीवर आहे. 

एकापाठोपाठ एक फलंदाज माघारी परतत असताना विराट कोहली एका बाजुने तटबंदीप्रमाणे मैदानावर खिंड लढवत होता. मात्र मधल्या फळीतील आणि तळाच्या एकाही फलंदाजाची साथ त्याला लाभली नाही. 62 चेंडूंत 7 चौकार आणि 4 षटकारांची बरसात करत नाबाद 92 धावा विराटने केल्या. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.  

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू 

  1. विराट कोहली - 4619 धावा
  2. सुरेश रैना - 4558 धावा
  3. रोहीत शर्मा - 4345 धावा
  4. गौतम गंभीर - 4210 धावा
  5. डेव्हीड वॉर्नर - 4014 धावा 

 

विराट खेळी व्यर्थ, मुंबईचा विजय - 

पहिल्या तीन सामन्यांत पराभवाची चव चाखल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 11व्या पर्वात आपल्या विजयाचा श्रीगणेशा केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 46 धावांनी धूळ चारत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने विजय संपादन केला. रोहित शर्मा आणि इविन लुइस यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने 213 धावांचा डोंगर उभा केला. बंगळुरूचे दिग्गज शिलेदार एकापाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये परतत असताना विराट कोहली तटबंदीप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत होता. पण अखेर बंगळुरूला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. 

 

 

टॅग्स :आयपीएल 2018विराट कोहलीमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसुरेश रैना