नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नरची आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी स्टीव्हन स्मिथची राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
हैदराबादच्या संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शंगमुगम यांनी ट्विटरद्वारे सांगितले की, " सध्याची परिस्थिती पाहता वॉर्नरने हैदराबादच्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा लवकरच केली जाईल. "
वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादने 2016 साली आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. 2017 साली हैदराबादचा संघ बाद फेरीत पोहोचला होता. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. पण आता त्याला संघाचे कर्णधारपद सोडावे लागणार आहे. वॉर्नरच्या जागी हैदराबादच्या कर्णधारपदी सलामीवीर शिखर धवनची वर्णी लागू शकते.