नवी दिल्ली : पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या गौतम गंभीरने कर्णधारपद सोडले आणि युवा श्रेयस अय्यरकडे दिल्ली डेअरडेव्हिल्सची धुरा सोपवली. श्रेयसने कर्णधारपद स्वीकारल्यावर संघाचे नशिब पालटले. श्रेयसने शुक्रवारी झालेल्या आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात नाबाद 93 धावांची धुंवाधार खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण या खेळीत श्रेयसने एक षटकार खेचला आणि तो चेंडू सीमारेषेबाहेर डगआऊटमध्ये बसलेल्या गंभीरच्या समोरच पडला. त्यावेळी गंभीर आणि अन्य खेळाडूंची प्रतिक्रीया ही पाहण्यासारखी होती.
आपल्या 93 धावांच्या खेळीत श्रेयसने तब्बल दहा षटकार लगावले. यामधला एक षटकार गंभीरच्या समोर पडला. हा चेंडू पडत असताना डगआऊटमधील खेळाडू आपल्याला दुखापत होऊ नये म्हणून जागा सोडून उभे राहिले. पण गंभीर मात्र बसूनच होता. हा चेंडू त्याच्या समोर पडला तेव्हा गंभीरने, श्रेयसने काय षटकार लगावलाय, असे हावभाव चेहऱ्यावर दाखवले. पण काही जणांच्या मते, श्रेयसने या षटकाराच्या निमित्ताने फलंदाजी कशी करायची हे गंभीरला दाखवून दिले.