मुंबई : सनरायझर्स हैदराबादच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली ती रशिद खानच्या दमदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर. शुक्रवारी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रशिदने तुफानी फलंदाजी तर केलीच, पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्येही चमक दाखवली. त्यामुळेच तो हैदराबादच्या विजयाचा नायक ठरला होता. पण आपल्या या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रशिदने काही विक्रम पादाक्रांत केले आहेत.
दुसऱ्या क्वालिफारच्या सामन्यात हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. हैदराबादच्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता येईल की नाही, याबाबत शंका होती. पण रशिद फलंदाजीला आला. त्याने फक्त 10 चेंडूंत चार षटकारांच्या जोरावर नाबाद 34 धावा केल्या. त्यामुळेच हैदराबादला 174 धावांची मजल गाठला आली. त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने तीन बळी मिळवले, त्याचबरोबर दोन झेल टिपत कोलकात्याच्या एका फलंदाजाला धावचीतही केले. अशी कामगिरी करणारा रशिद हा आयपीएलमधला पहिला खेळाडू ठरला आहे. कारण आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही खेळाडूला रशिदसारखा नेत्रदीपक कामगिरी करता आलेली नाही.
यंदाच्या आयपीएलमध्ये रशिदने अंतिम सामन्यापूर्वी एकूण 21 बळी मिळवले आहेत. आतापर्यंत कोणत्याही परदेशी फिरकीपटूला आयपीएलमध्ये एवढे बळी मिळवता आलेले नाहीत. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नच्या नावावर होता. वॉर्नने 2008 साली राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 19 बळी मिळवले होते.