मुंबई : यंदाच्या आयपीएलचे जेतेपद चेन्नई सुपर किंग्जने पटकावले. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला तो केन विल्यम्सन. पर्पल कॅप पटकावली ती अॅण्ड्रयू टायने, हे सारे तुम्हाला माहिती असेलच. पण यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला, हे मात्र तुमच्या गावीही नसेल. सर्वात वेगवान गोलंदाज हा चेन्नईच्या संघातला नाही, सनरायझर्स हैदराबादच्या संघातीलही नाही, तर हा गोलंदाज ठरला आहे राजस्थान रॉयल्सच्या संघातील.
यंदाच्या आयपीएलमध्ये हैदराबादच्या संघाचे गोलंदाजी हे बलस्थान होते. गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादने भल्या भल्या फलंदाजांना नाचवत विजय मिळवले. पण सर्वात वेगवान चेंडू हैदराबादच्या एकाही गोलंदाजाला टाकता आला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडी टाकला तो राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने.
राजस्थानच्या आर्चरने एका सामन्यात तब्बल 152.39 कि.मी. प्रति तासाच्या वेगाने चेंडू टाकला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये हा सर्वात वेगवान चेंडू ठरला. आर्चरनंतर हैदराबादच्या बिली स्टेनलेकने 151.38 कि.मी. प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी केली. सर्वात वेगवान चेंडूच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे तो आर्चर. कारण एका सामन्यात आर्चरने 150.82 कि.मी. प्रति तासाच्या वेगाने चेंडू टाकला होता. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर मोहम्मद सिराज (149.94 ) आणि शिवम मावी (149.86 ) हे दोन वेगवान गोलंदाज आहे.