नवी दिल्ली : कर्णधारपद गमावल्यावर गौतम गंभीरला दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. श्रेयस अय्यरने कर्णधारपद स्वीकारल्यावर गंभीरचा काटा काढला, असा कयासही काही जणांनी लावला. पण गंभीरला न खेळवण्याचा निर्णय नेमका कुणाचा होता, असा प्रश्नही काही जणांना पडला आहे.
कोलकाता नाईट रायडर्समधून गंभीर या वर्षी दिल्लीच्या संघात आला. हा माझा शेवटचा मोसम असेल आणि मला दिल्लीचा जेतेपद जिंकवून द्यायचे आहे, असे गंभीरने आयपीएल सुरु होण्यापूर्वी सांगितले होते. पण गंभीरच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाला चांगली कामिगरी करता आली नाही. गंभीरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने सहा सामन्यांमध्ये फक्त एकच लढत जिंकली होती. त्यामुळेच गुणतालिकेत ते तळाला होते.
आपल्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामिगरी करत नाही, हे पाहिल्यावर गंभीरने दिल्लीचे नेतृत्व सोडायचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीच्या संघ व्यवस्थापनाने श्रेयसच्या गळ्यात नेतृत्वाची माळ घातली. पण श्रेयस नेतृत्व करत असलेल्या पहिल्याच सामन्यात गंभीर संघात दिसला नाही. त्यावेळी अनेकांनी भुवया उंचावल्या आणि या गोष्टीसाठी श्रेयसला जबाबदार ठरवले जात होते. पण कोलकाताविरुद्धच्या सामन्यात गंभीर का खेळला नाही, याचा खुलासा श्रेयसने केला.
श्रेयस म्हणाला की, " गंभीरला न खेळवण्याचा निर्णय माझा होता, असे बऱ्याच जणांना वाटत असेल, पण हे सत्य नाही. या सामन्यात गंभीरने स्वत:हून खेळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे न खेळण्याचा निर्णय माझा किंवा संघ व्यवस्थापनाचा नक्कीच नव्हता. गंभीरने या निर्णयामागचे कारण मात्र आम्हाला सांगितले नाही. "