मुंबई - बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने मुंबईविरुद्ध काल झालेल्या सामन्यात 92 धावांची नाबाद खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याची खेळी कमी पडली. संघाचा पराभव आक्रमक स्वभावाच्या विराट कोहलीच्या पचनी पडला नाही. 92 धावांच्या खेळीनंतर विराट आयपीएलच्या 11 व्या सत्रात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. सामन्यानंतर त्याला ऑरेंज कॅप देण्यात आली. पण संघाचा पराभव झाल्यामुळं विराटचा राग शांत झाला नव्हता.
सामन्यानंतर विराट कोहलीला ऑरेंज कॅप देण्यात आली त्यावेळी पहिल्यांदा त्याने ती घालण्यास नकार दिला. पण नंतर त्याने ती घेतली. ऑरेंज कॅप घेताना विराटने आपला राग व्यक्त केला. कोहली म्हणाला की, सध्या ऑरेंज कॅप घालण्याची इच्छा नाही, ती फेकून द्यावीशी वाटतेय. सध्या माझ्या डोक्यात विकेट कशा पडल्या हा एकच सध्या माझ्या डोक्यात सुरु आहे. कोहलीचा राग फक्त पंचावर नाही तर संघातील खेळाडूंवरही होता. मैदानावर विराट कोहलीने एकट्याने लढा दिला. संघातील एकाही खेळाडूनं त्याला साथ दिली नाही. त्यामुळ विराट कोहली रागात होता.
पंचावरही व्यक्त केला राग - हार्दिक पंड्या पहिल्याच चेंडूवर फटका मारण्यात अपयशी ठरला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षक क्विंटन डी'कॉकच्या हातात विसावला. तेव्हा बंगळुरुच्या खेळाडूंनी हार्दिक बाद झाल्याचे अपील केले आणि मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले. पण पंड्याने या निर्णयाविरोधात डिआरएस पद्धतीचा वापर केला. तिसऱ्या पंचांनी पंड्याला नाबाद ठरवले. कारण पंड्या बाद असल्याचे मैदानावरील स्क्रीन दिसत होते असे विराट कोहलीचे मत होते.
रैनाचा विक्रम मोडला -
विराटनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं या सामन्यात 32 वी धाव घेऊन रैनाचा विक्रम मोडला आहे. हा विक्रम विराटने त्याच्या 153 व्या सामन्यात केला आहे. त्याने हा विक्रम करताना रैनापेक्षा 10 सामने कमी खेळले आहेत. सुरेश रैनानं आयपीएलच्या 163 सामन्यांमध्ये 4558 धावांचा रतीब घातला होता. विराट कोहलीनं 153 व्या सामन्यात हा विक्रम मोडला. त्यामुळं त्याच्या नावावर आता 153 सामन्यांमध्ये 4619 धावांचा इमला उभा राहिला आहे.
विराट खेळी व्यर्थ, मुंबईचा विजय -
पहिल्या तीन सामन्यांत पराभवाची चव चाखल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 11व्या पर्वात आपल्या विजयाचा श्रीगणेशा केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 46 धावांनी धूळ चारत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने विजय संपादन केला. रोहित शर्मा आणि इविन लुइस यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने 213 धावांचा डोंगर उभा केला. बंगळुरूचे दिग्गज शिलेदार एकापाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये परतत असताना विराट कोहली तटबंदीप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत होता. पण अखेर बंगळुरूला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.