नवी दिल्ली : आयपीएलचा हा हंगाम सर्वात वेगळा ठरू शकतो. कारण बीसीसीआयने या हंगामात ' डीआरएस 'चा (पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याची प्रणाली) वापर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या हंगामात आयपीएलमध्ये अधिक रंजकता वाढेल, असे म्हटले जात आहे. ' डीआरएस 'चा वापर करणारी आयपीएल ही दुसरी स्थानिक लीग ठरणार आहे.
आयपीएलच्या अकराव्या हंगामाला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या हंगामात आयपीएलमध्ये 51 सामने खेळवण्यात येणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 27 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती बुधवारी दिली. याबाबत शुक्ला म्हणाले की, " यंदाच्या आयपीएलमध्ये ' डीआरएस 'चा वापर करण्यात येणार आहे. "
बीसीसीआय ' डीआरएस 'च्या वापराच्या विरोधात होती. पण 2016 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्यांदा ' डीआरएस 'चा वापर करायला बीसीसीआयने मान्यता दिली होती. त्यानंतर विशाखापट्टण येथे भारताच्या दहा पंचांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते.