हैदराबाद, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने रविवारी आपल्या चमूत 16 वर्षीय प्रयास रे बर्मनला दाखल करून घेतले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून प्रयास इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण करणार आहे. यासह आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणाऱ्या खेळाडूचा माना प्रयासने पटकावला. प्रयासने 16 वर्ष आणि 157 दिवशी आयपीएलमध्ये पदार्पण केले.
विराट कोहलीसोबत खेळण्याचे स्वप्न पूर्णदुर्गापूर येथे 25 ऑक्टोबर 2002 मध्ये प्रयास रे बर्मनचा जन्म झाला. त्याचे वडील कौशिक रे बर्मन हे डॉक्टर आहेत आणि ते प्रयासला नवी दिल्लीत घेऊन आले.
दक्षिण दिल्लीतल्या गार्गी कॉलेजमधील राम पाल क्रिकेट अकादमीतून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. पण, दुर्गापूर क्रिकेट केंद्रात त्यानं शिबनाथ रे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवले.
अंबर रॉय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करून प्रयासने सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर बंगालच्या 16 वर्षांखालील संघात त्याची निवड झाली. उत्तर कोलकाता येथील दुमदुम पार्क येथे लहानशा खोलीत तो राहत होता. त्याच्या वडिलांनी नवी दिल्लीतून पुन्हा कोलकाता येथे स्थलांतर केले.
RCB नं ताफ्यात दाखल करून घेतल्यानंतर प्रयास बंगळुरूत राहायला आला, तेथे त्याची बहिण आयटी क्षेत्रात काम करते.
बंगालच्या 15 वर्षांखालील संघाकडून खेळताना त्याने 2012-13च्या मोसमात 4 सामन्यांत 7 विकेट्स घेतल्या.
विजय हजारे चषक स्पर्धेत त्यानं बंगालकडून लिस्ट A क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2018 मध्ये जम्मू-काश्मीरविरुद्ध तो पहिला सामना खेळला. पहिल्याच सामन्यात त्यानं 5 षटकांत 20 धावा देताना 4 विकेट घेतल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. प्रयासने 11 लिस्ट A क्रिकेट सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत.
फिरकीपटू असलेला प्रयास हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न याचा चाहता आहे.
त्याला विराट कोहलीसह खेळायचे होते आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे.