मुंबई, आयपीएल २०१९ : एबी डी'व्हिलियर्सची वादळी खेळी पाहण्याचा योग आज वानखेडेवर आला. डी'व्हिलियर्सच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मुंबई इंडियन्सपुढे 172 धावांचे आव्हान ठेवता आले.
मुंबईने नाणेफेक जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पण बंगळुरुला पहिलाच धक्का कर्णधार विराटकोहलीच्या रुपात बसला. कोहलीला आठ धावा करता आल्या. त्यानंतर पार्थिव पटेलही फटकेबाजी करत होता, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पार्थिवने २० चेंडूंत २८ धावा केल्या.
पार्थिव पटेल बाद झाल्यावर वानखेडेवर आले ते एबी डी'व्हिलियर्सचे वादळ. डी'व्हिलियर्सला यावेळी मोईन अलीने चांगली साथ दिली. या दोघांनी बंगळुरूची धावांची गती वाढवली. अलीने ३२ चेंडूंत ५० धावा केल्या.
अली बाद झाल्यावर डी'व्हिलियर्सने अखेरच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी केली. डी'व्हिलियर्सने ५१ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या.