IPL 2019: चेंडू स्टम्पला लागलाच नाही, तरीही आउट झाला अमित मिश्रा!

दिल्ली-हैदराबाद सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये क्रिकेटमधील एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 01:41 PM2019-05-09T13:41:02+5:302019-05-09T13:44:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Amit Mishra second player dismissed for obstructing the field in IPL | IPL 2019: चेंडू स्टम्पला लागलाच नाही, तरीही आउट झाला अमित मिश्रा!

IPL 2019: चेंडू स्टम्पला लागलाच नाही, तरीही आउट झाला अमित मिश्रा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देहैदराबादच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये ३ चेंडूंत २ धावांची गरज होती.याच षटकात क्रिकेटमधील एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली. अमित मिश्रा धावल्याचं पाहून साहानं त्याला रन-आउट करायचा प्रयत्न केला. परंतु...

आयपीएल २०१९: दिल्ली कॅपिटल्सनं सनरायजर्स हैदराबादला नमवून आयपीएलच्या अंतिम फेरीच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता क्वालिफायर-२ मध्ये बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्सशी त्यांना दोन हात करावे लागतील. या लढाईतील विजेत्याची गाठ मुंबई इंडियन्सशी पडेल. या कठीण वाटचालीसाठी आवश्यक असलेलं मनोधैर्य दिल्लीला कालच्या सामन्यानं दिलं. पृथ्वी शॉनं अर्धशतकी खेळी करून रचलेल्या पायावर रिषभ पंतनं विजयाचा कळस चढवला आणि हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. सामन्याचा थरार शेवटच्या षटकापर्यंत रंगलाच, पण याच षटकात क्रिकेटमधील एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली. ती होती, अमित मिश्राचं धावचित होणं. चेंडू स्टम्पला लागला नसतानाही क्रिकेटमधील एका नियमाच्या आधारे त्याला बाद दिलं गेलं. 

हैदराबादच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये ३ चेंडूंत २ धावांची गरज होती. खलील अहमद गोलंदाजी करत होता आणि अमित मिश्रा स्ट्राईकवर होता. खलीलच्या चेंडूवर अमित मिश्रानं बॅट फिरवली, पण फटका चुकला आणि चेंडू यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या हाती गेला. अमित मिश्रा धावल्याचं पाहून साहानं त्याला रन-आउट करायचा प्रयत्न केला. परंतु, त्यानं फेकलेला चेंडू स्टम्पला न लागता गोलंदाज खलील अहमदकडे गेला. त्यानं झटक्यात चेंडू उचलून नॉन-स्ट्राईक एन्डवर अमित मिश्राला धावचित करायचा प्रयत्न केला. परंतु, खलीलनं फेकलेला चेंडू स्टम्पना लागणं तर सोडाच, पण त्या दिशेनं गेलाच नाही. स्वाभाविकच, मैदानावरील पंचांनी बाद देण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु, हैदराबादच्या खेळाडूंनी डीआरएससाठी अपील केलं. 

सुरुवातीला, हे अपील झेलबादसाठी असल्याचा पंचांचाही समज झाला. तिसऱ्या पंचांनीही ते तपासून पाहिलं आणि अमित मिश्राला नाबाद ठरवलं. परंतु, हैदराबादचं अपील 'ऑब्सट्रक्टिंग द फील्ड'साठी होतं. आपण धाव पूर्ण करू शकणार नाही, याची कल्पना आल्यानं अमित मिश्रा स्टम्पच्या समोरून धावत होता. खलीलनं फेकलेला चेंडू त्याच्यामुळे अडला होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी पुन्हा संपूर्ण प्रसंग तपासून अमित मिश्राला बाद दिलं. 


आयपीएल स्पर्धेत 'ऑब्सट्रक्टिंग द फील्ड' या कारणामुळे बाद होणारा अमित मिश्रा हा दुसरा खेळाडू ठरला. २०१३ मध्ये युसूफ पठाण असाच 'आउट' झाला होता.



 

Web Title: IPL 2019: Amit Mishra second player dismissed for obstructing the field in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.