बंगळुरु, आयपीएल 2019 : हार्दिक पंड्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाद फलंदाजी केली. पंड्याच्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सला 187 धावा करता आल्या. पण या सामन्यात एकदा पंड्याने आपल्या बेटकुळ्या दाखवल्याची गोष्ट पाहायला मिळाली. पंड्याने बेटकुळ्या दाखवल्यावर बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचा चेहरा चांगलाच पडलेला पाहायला मिळाला.
मोहम्मद सिराज या सामन्यातील 20वे षटक टाकत होता. पंड्याने त्याचा चांगलाच समाचार घेतला. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर तर पंड्याने जोरदार षटकार लगावला. हा गगनचुंबी षटकार थेट मैदानाबाहेर गेला. हा षटकार मारल्यावर पंड्याने आपल्या बेटकुळ्या दाखवल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा आणि क्विंटन डी' कॉक यांनी मुंबईला अर्धशतकी सलामी दिली. पण सातव्या षटकात चुकीचा फटका मारण्याच्या नादात क्विंटन बाद झाला. त्यानंतर रोहितलाही जास्त काळ तग धरता आला नाही. रोहितचे अर्धशतक यावेळी फक्त दोन धावांनी हुकले. रोहितने 33 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 48 धावा केल्या. रोहितनंतर युवराज सिंगने धडाकेबाज फटकेबाजी केली. युवराजने युजवेंद्र चहलच्या 14व्या षटकाच्या पहिल्या तिन्ही चेंडूंवर षटकार लगावले. पण चौथ्या चेंडूवर मात्र युवराज बाद झाला. सूर्यकुमार यादवने गोलंदाजीचा काहीसा प्रतिकार केला, पण त्यालाही अर्धशतकाची वेस ओलांडता आली नाही. सूर्यकुमारसह चार फलंदाज फक्त पाच धावांमध्ये तंबूत परतले. या चार फलंदाजांमध्ये सूर्यकुमारसह किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या आणि मिचेल मॅक्लेघन यांचा समावेश होता.