हैदराबाद, आयपीएल २०१९ : भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झाचा नवीन लूक आयपीएलच्या मैदानात पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स आणि सनपायझर्स हैदराबाद यांच्यामधील सामन्यात सानिया पाहायला मिळाली. बाळंतपणानंतर सानिया पहिल्यांदाच एखादा सामना पाहायला आली होती. यापूर्वी सानिया भारतामध्ये आहे कि नाही याबाबतही कोणाला माहिती नव्हती.
यावेळी सानिया हैदराबादच्या संघाला चीअर करत होती.
दमदार सलामी मिळाल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्सला फक्त 132 धावांवरच समाधान मानावे लागले.
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी चेन्नईच्या शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ७९ धावांची सलामी दिली. वॉटसनने यावेळी २९ चेंडूंत ३१ धावा केल्या. शेनपेक्षा फॅफ चांगल्या फॉर्मात होता. फॅफने ३१ चेंडूंत ४५ धावांची खेळी साकारली. या ४५ धावांच्या खेळीत फॅफने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले.
शेन आणि फॅफ जेव्हा बाद झाले तेव्हा अकराव्या षटकात चेन्नईची २ बाद ८१ अशी स्थिती होती. पण त्यानंतर कर्णधार सुरेश रैना, केदार जाधव, सॅम बिलिंग्स हे झटपट बाद झाले आणि चेन्नईचा डाव अडचणीत आला. त्यानंतर अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांनी संघाला सावरले.