हैदराबाद, आयपीएल 2019 : ख्रिस लीन आणि रिंकु सिंग यांच्या संघर्षानंतरही कोलकाता नाइट रायडर्सला रविवारी आयपीएलच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 8 बाद 159 धावा करता आल्या. चांगल्या सुरुवातीनंतर सातत्याने पडत राहिलेल्या विकेट्समुळे कोलकाताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हैदराबादच्या गोलंदाजांनी त्यांच्यावरील जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. कोलकाताचा हुकमी एक्का आंद्रे रसेल याला फलंदाजीची फार संधी मिळाली नाही, परंतु त्याने 15 धावांच्या खेळीतही विक्रमाला गवसणी घातली.
ख्रिस लीन आणि सुनील नरीन यांनी हैदराबादने दिलेले प्रथम फलंदाजीचे आव्हान स्वीकारत दमदार सुरुवात केली. या दोघांनी 2.3 षटकांत 42 धावा चोपल्या. हैदराबादच्या खलील अहमदच्या तिसऱ्या षटकात नरीनने 6,4,4 अशी फटकेबाजी केली, परंतु खलीलने चौथ्या चेंडूवर नरीनचा दांडा उडवला. नरीन 8 चेंडूंत 25 धावा ( 3 चौकार व 2 षटकार) करून माघारी परतला. पाचव्या षटकात खलीलने कोलकाताला आणखी एक धक्का दिला. त्याने शुबमन गिलला झेलबाद केले. कोलकाताला 50 धावांवर दोन झटके बसले. कोलाकाताने पॉवर प्लेमध्ये 2 बाद 62 धावा केल्या. हैदराबादविरुद्धची ही कोणत्याही संघाने यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. लीन आणि नितीश राणा ही जोडी कोलकाताला तारेल असे वाटत असताना भुवनेश्वर कुमारने धक्का दिला. त्याने राणाला (11) यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले.
कर्णधार दिनेश कार्तिकही 5 धावांची भर घालून धावबाद झाला. एक अतिरिक्त धाव घेण्याच्या प्रयत्नात कार्तिक आपली विकेट गमावून बसला. कोलकाताने 10 षटकांत 4 बाद 80 धावा केल्या. त्यानंतर रिंकु सिंगने सलामीवीर लीनला तोलामोलाची साथ देत संघाला तिहेरी आकडा पार करून दिला. कोलकाताने 15 षटकांत 4 बाद 116 धावा केल्या होत्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. 16व्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात रिंकु बाद झाला. त्याने 25 चेंडूंत 30 धावा केल्या. लीनने 45 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, पुढच्याच चेंडूवर हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने अप्रतिम झेल टिपत त्याला माघारी पाठवले. खलीलने सामन्यातील तिसरी विकेट घेतली. लीनच्या 51 धावांच्या खेळीत 4 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. 18वे षटक पियूष चावलानं व्यर्थ घालवले. रशीद खानने टाकलेल्या त्या षटकात कोलकाताला केवळ एकच धाव घेता आली.
आंद्रे रसेलने 19व्या षटकात कॅरेबीयन स्टाईल फटकेबाजी करताना कोलकाताला समाधानकारक पल्ला गाठून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुवनेश्वरने त्याला बाद केले. भुवनेश्वरला दोन षटकार खेचल्यानंतर रसेलने आणखी एक चेंडू हवेत टोलावला, परंतु यावेळी त्याला सीमा रेषा ओलांडता आली नाही. रशीद खानने त्याचा झेल टिपला. रसेल 9 चेंडूंत 2 षटकारांसह 15 धावा केल्या. या दोन षटकारासह त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये 41 षटकार खेचण्याचा विक्रम केला. आयपीएलच्या एका हंगामात 40 हून अधिक षटकार खेचणारा तो ख्रिस गेलनंतर दुसरा खेळाडू ठरला आहे.
पाहा व्हिडीओhttps://www.iplt20.com/video/176001/m38-srh-vs-kkr-andre-russell-six?tagNames=indian-premier-league