कोलकाता, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्सच्या आंद्रे रसेलने शुक्रवारी पुन्हा एकदा वादळी खेळी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीचे तणाव वाढवले होते. मात्र, अखेरच्या षटकात रसेल बाद झाला आणि बंगळुरूला 10 धावांनी विजय मिळवता आला. रसेलने 25 चेंडूंत 65 धावांची वादळी खेळी करताना बंगळुरूच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. त्याच्या या खेळीत 2 चौकार आणि 9 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे.
विजयासाठी 24 धावांची आवश्यकता असताना कोहलीनं सामन्यातील अखेरचे षटक टाकण्यासाठी मोइन अलीला पाचारण केले आणि अलीनं तो निर्णय योग्य ठरवला. अलीनं अखेरच्या षटकात 13 धावा देत कोलकाताला हार मानण्यास भाग पाडले. या सामन्यात कोहलीनं 58 चेंडूंत 100 धावा केल्या आणि त्यात 9 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. अलीनेही 28 चेंडूंत 5 चौकार व 6 षटकार खेचून 66 धावा कुटल्या. बंगळुरूचा हा नऊ सामन्यांतील दुसरा विजय आहे.
या सामन्यात कोहली आणि अली यांचं नाणं खणखणीत वाजलं असलं तरी रसेलनं अनेक विक्रम केले. रसेलने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 8 डावांत 220 च्या स्ट्राईक रेटने 39 षटकार खेचले आहेत. आयपीएलच्या इतिहासात रसेलने 185.49च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या आहेत. केवळ चारच खेळाडूंचा स्ट्राईक रेट रसेलपेक्षा जास्त आहे, परंतु त्या चौघांनी मिळून केवळ 26 चेंडूंचा सामना केला आहे.आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रसेल चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 8 डावांत 177 चेंडूंचा सामना करताना 377 धावा केल्या आहेत. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे आणि त्याने 23 चौकार व 39 षटकार खेचले आहेत. शिवाय ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, लेंडल सिमन्स आणि ड्वेन ब्राव्हो यांच्यानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा रसेल हा चौथा कॅरेबीयन फलंदाज आहे. तसेच विकेट घेण्याच्या बाबतीतही तो दहाव्या क्रमांकावर आहे. त्याने 296 सामन्यांत 4833 धावा केल्या आहेत आणि 266 विकेट्स घेतल्या आहेत.
बंगळुरूच्या 213 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्सने 11.5 षटकांत 4 बाद 79 धावा केल्या होता. हा सामना कोलकाताच्या हातून निसटला असेच चित्र होते. मात्र, रसेलने तुफान आतषबाजी करताना सामन्यात चुरस निर्माण केली. नितीश राणानेही त्याला उत्तम साथ दिली आणि अखेरच्या षटकापर्यंत थरार रंगला. रसेलने राणासह 48 चेंडूंत 118 धावांची भागीदारी केली. मात्र, अखेरच्या षटकात रसेल बाद झाला आणि बंगळुरूने 10 धावांनी विजय मिळवला.
बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात रसेलने 9 षटकार खेचले आणि कोलकाताकडून सर्वाधिक 100 षटकार खेचणारा तो पहिला फलंदाज ठरला. शिवाय त्याने गोलंदाजीत बंगळुरूच्या अक्षदीप नाथला बाद करून कोलकाताकडून विकेट्सचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या पहिल्या गोलंदाजाचा मानही पटकावला.
सेलने केवळ 21 चेंडूंत अर्धशतकी खेळी केली. यंदाच्या मोसमातील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतने 18 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर रसेलचा क्रमांक येतो.