कोलकाता, आयपीएल २०१९ : कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलची झोकात सुरुवात केली होती. पण गेल्या काही सामन्यांमध्ये मात्र त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळेच गुणतालिकेत केकेआरची घसरण झाली आहे. त्यामध्येच केकेआरचा स्टार खेळाडू आंद्रे रसेलने संघाला घरचा अहेर देताना कर्णधार दिनेश कार्तिकवर तोफ डागली आहे.
रसेल म्हणाला की, " आमच्या संघाची कामगिरी आयपीएच्या सुरुवातीला चांगली झाली होती. पण काही चुकीच्या निर्णयांमुळे आम्हाला पराभव पाहावे लागत आहेत. संघाने योग्यवेळी उचित निर्णय घेतले नाहीत. चुकीच्यावेळी चुकीच्या गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्त केले गेले. त्याचबरोबर संघातील चांगल्या फलंदाजांना योग्य संधी दिली नाही. त्यामुळे केकेआरची सध्याची अवस्था चांगली नाही."
खचलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला गौतम गंभीरची साथ
आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात माजी विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला आहे. 10 सामन्यांत केवळ चार विजयांसह KKR संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. या हंगामात त्यांनी सुरुवात तर चांगली केली, परंतु त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले. त्यामुळे कोलकाता संघाचे मनोबल खचले आहे, परंतु त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता KKRचा माजी कर्णधार गौतम गंभीर धावला आहे. भारतीय संघाच्या माजी खेळाडूने सोशल मीडियावर KKR साठी विशेष मॅसेज पाठवला आहे.
गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने आयपीएलची दोन जेतेपदं नावावर केली. मात्र, सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या गंभीरला संघाने बाहेर केले. तरीही गंभीरनं KKRला मनातून दूर केलेले नाही. संघाची अवस्था पाहून त्याने खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. कोलकाताचे आणखी चार सामने शिल्लक आहेत आणि त्यात दमदार कामगिरी करून विजय मिळवा, असा सल्ला गंभीरने दिला आहे. गंभीरने यावेळी कर्णधार दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले.त्याचबरोबर संघाचा आत्मविश्वास कसा वाढेल, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्याने सांगितले आहे. KKR च्या संघात चांगली गुणवत्ता आहे आणि ते जेतेपदही पटकावू शकतात, असेही गंभीरला वाटते.