मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल 2019) 12व्या मोसमाला आजपासून सुरूवात होत आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स उद्घाटनीय सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. चेन्नई चौथ्या जेतेपदासाठी, तर बंगळुरु पहिल्या आयपीएल जेतेपद पटकावण्याचा शुभारंभ या सामन्यापासून करणार आहे. दोन्ही संघांनीही जोरदार तयारी केली आहे, परंतु मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगाच्या माघारीनंतर मुंबईचा आणखी एका गोलंदाजाने माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबईच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज अॅडम मिल्ने जायबंद झाला असून त्याने संपूर्ण आयपीएल 2019मधून माघार घेतली आहे. मुंबईने 2019च्या लिलावात 75 लाख रुपयांत मिल्नेला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मिल्नेला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे. मिल्नेच्या जागी संघात कोणाला स्थान देणार, याची घोषणा अद्याप मुंबई इंडियन्सकडून करण्यात आलेली नाही. ESPNCricinfoच्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्स वेस्ट इंडिजच्या अल्जारी जोसेफशी करार करण्याची शक्यता आहे. पण, मिल्नेच्या जागी येणाऱ्या अन्जारीला मुंबई इंडियन्स 75 लाखांपेक्षा अधिक रक्कम देऊ शकत नाही. आयपीएलचे जेतेपद तीनवेळा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला आधीच लसिथ मलिंगाच्या रुपाने मोठा धक्का बसला होता आणि त्यात मिल्नेची भर पडली आहे.
मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा सामना करण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज मलिंगाला आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांत खेळता येणार नाही. श्रीलंकेच्या या दिग्गज गोलंदाजाला राष्ट्रीय कर्तव्यावर परतावे लागणार आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवताना श्रीलंकेच्या निवड समितीनं त्याला स्थानिक वन डे स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे.
गतवर्षी मलिंगा मुंबई इंडियन्सच्या साहाय्यक खेळाडूंच्या चमूत होता, परंतु लिलावात मुंबईने त्याला स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून 2 कोटी रुपयांत संघात दाखल करून घेतले. सध्या तो श्रीलंकेच्या वन डे संघाचे कर्णधारपद भूषवित आहे आणि स्थानिक वन डे स्पर्धेत तो गॅल संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. ही स्पर्धा 4 ते 11 एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यामुळे मलिंगाला आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांना मुकावे लागणार आहे. 26 मार्चला तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होईल. सध्या मलिंका श्रीलंकेच्या संघासह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.
''आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी श्रीलंका क्रिकेट मंडळाकडे ना-हरकत प्रमाणपत्र मागितले आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद होता. परंतु, वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता त्यांनी मला स्थानिक वन डे स्पर्धेत खेळण्यास सांगितले. त्यामुळे मीही होकार कळवला आणि मंडळालाच आयपीएल व मुंबई इंडियन्सला याबाबत कळवण्याची विनंती केली. आयपीएलमधून काही पैसे कमावता येणार नसले तर देशासाठी काहीतरी करता येईल, याचा आनंद आहे."