मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) 23 मार्चपासून सुरू होणार आहे. महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या तयारीसाठी सर्व संघ कसून सराव करत आहेत. आयपीएलच्या निमित्ताने भारतीय संघात एकत्र खेळणारे खेळाडू एकमेकांविरुद्ध पुन्हा दंड थोपटण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण, मैदानावरील प्रत्यक्ष युद्धापूर्वी हे खेळाडू मैदानाबाहेर एकमेकांना आव्हानं देत आहेत. काही दिवसांपूर्वी रिषभ पंतने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला, तर जसप्रीत बुमराने सध्याचा कर्णधार विराट कोहलीला चॅलेंज केले होते. बुमराहच्या या आव्हानाला कोहलीने उत्तर दिले आहे आणि त्याला चिकू म्हणणं महागात पडेल, असेही तो म्हणाला.
मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बुमराने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्याने कोहलीला बाद करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला,''मी सर्वोत्तम गोलंदाज.... नाही यार अजून तर जगातील सर्वोत्तम फलंदाजाला ( विराट कोहली) त्रिफळाचीत करायचे आहे. मी येतोय चिकू भैया (कोहली) आणि यावेळी तु माझ्या संघातही नसशील.''
यावर विराटने उत्तर दिले. तो म्हणाला,'' चिकू भैया? आता कॅप्टनशीच स्लेजिंग. शेवटी तुही शिकलास, फक्त चिकू भैयाकडून कोणतीही उधारी अपेक्षित ठेवू नकोस.''
पण, पंतने थेट माहीला चॅलेंज दिले होते. पंतने एक व्हिडीओ ट्विट करून थेट धोनीला आव्हान केले होते. तो म्हणाला,'' माही भाई हे मला गुरू समान आहेत. तो नसता तर मी यष्टिरक्षक-फलंदाज झालो नसतो. पण, यावेळी त्याच्या संघाविरुद्ध मी अशी फटकेबाजी करेन की, कॅप्टन कूल माही कूल राहणार नाही. माही भाई तयार राहा, खेळ दाखवायला येत आहे.''
पंतचे हे आव्हान स्वीकारत धोनीनं त्याला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.