मोहाली, आयपीएल 2019 : एखाद्या फलंदाजाला रन आऊट कसा करावा, याचा उत्तम वस्तुपाठ किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने दाखवून दिला. या सामन्यात अश्विनने ज्याप्रकारे सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजाला रन आऊट केले ते नजरेचे पारणे फेडणारे होते.
पंजाबने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. हैदराबादने यावेळी सावध सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर हा एका बाजूने धावफलक हलता ठेवत होता. त्यावेळी त्याला तिसऱ्या विकेटसाठी मोहम्मद नबीची चांगली साथ मिळत होती. नबी आक्रमकपणे फटकेबाजी करत होता. त्यावेळी असा एक प्रकार घडला की साऱ्यांनाच धक्का बसला.
अश्विन 14वे षटक टाकत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूचा वॉर्नर सामना करत होता. त्यावेळी अश्विनच्या चेंडूवर वॉर्नरने मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट अश्विनच्या हातामध्ये गेला. त्यावेळी अश्विनने चलाखपणा दाखवला आणि नबीला रन आऊट केले.