मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सला ( KKR) दोन वेळा इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) जेतेपद जिंकून देणाऱ्या गौतम गंभीरला 2019च्या आयपीएल हंगामात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. KKR ने साथ सोडल्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सने (DD) गंभीरला हात दिला, परंतु दिल्लीने गंभीरला डावलण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 2019 च्या लिलाव प्रक्रियेसाठी गंभीर बोलीसाठी उपलब्ध असणार आहे. दिल्लीने त्याला 2.80 कोटी रुपयांत आपल्या चमूत दाखल करून घेतले होते.
गंभीरच्या नेतृत्वाखाली दिल्लीला अपेक्षित निकाल मिळाला नाही. मागील हंगामात त्यांना पहिल्य सहापैकी पाच सामन्यांत हार पत्करावी लागली होती. त्यानंतर गंभीरने कर्णधारपद सोडले आणि ही जबाबदारी श्रेयस अय्यरकडे देण्यात आली. कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर गंभीरला अंतिम अकरामध्येही खेळवण्यात आले नाही. त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने गंभीरने स्वतःहून अंतिम संघात न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
मात्र, गंभीरने वेगळीच माहिती दिली. तो म्हणाला,''अंतिम अकरा खेळाडूंमध्ये न खेळण्याचा निर्णय मी घेतलाच नाही. तसे करायचेच असते, तर मी थेट निवृत्तीच जाहीर केली असती.'' त्याचवेळी गंभीरला पुढील लिलाव प्रक्रियेत दिल्लीचा संघ मुक्त करणार हे निश्चित झाले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार गंभीरसह ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस आणि जेसन रॉय यांनाही दिल्ली सोडचिठ्ठी देणार असल्याचे समजत आहे.