बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची इंडियन प्रीमिअर लीगमधील पराभवाची मालिका पाचव्या सामन्यातही कायम राहिली. कोलकाता नाइट रायडर्सने शुक्रवारी बंगळुरूवर पाच विकेट राखून विजय मिळवला. 205 धावांचा डोंगर उभारूनही सुमार गोलंदाजीचा फटका बंगळुरूला बसला आणि त्यांना प्ले ऑफसाठीचे आव्हान कायम राखण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. पण, अवतीभवती सर्व नकारात्मकतेची चर्चा सुरू असताना कर्णधार विराट कोहलीला एक आशेचा किरण दिसू लागला आहे. कोहलीची बुडती नौका सावरण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने धाव घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नॅथन कोल्टर-नायल हा बंगळुरू संघाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार कोल्टर-नायर 13 एप्रिलला बंगळुरू संघात दाखल होणार आहे. तो सध्या पाकिस्तानविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑसी संघासोबत संयुक्त अरब अमिराती येथे आहे. त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध मोहालीत होणाऱ्या सामन्यात कोल्टर-नायल खेळण्याची शक्यता आहे. 2018च्या आयपीएल हंगामात कोल्टर-नायलला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. तरीही यंदा बंगळुरूने त्याला संघात कायम राखले. याही मोसमात त्याला पाच सामन्यांना मुकावे लागले आणि 1 मेनंतर तो पुन्हा ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने त्यांना 1 मेनंतर राष्ट्रीय कर्तव्यावर दाखल होण्याच्या सुचना केल्या आहेत. मार्कस स्टॉइनिसही 1 मेनंतर माघारी परतणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि पार्थिव पटेल यांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरू संघाने 205 धावा कुटल्या. पण कोलकाता नाइट रायडर्सने कोहलीला तणावात ठेवले होते. पवन नेगीने बंगळुरुच्या कर्णधाराचे टेंशन कमी केले, परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला योग्य साथ मिळाली नाही. आंद्रे रसेलने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका पार पाडली. त्याच्या फतकेबाजीच्या जोरावर कोलकाताने 5 विकेट व पाच चेंडू राखून सामना जिंकला. रसेलने 13 चेंडूंत 7 षटकार आणि 1 चौकार खेचून 48* धावा केल्या.