मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ज्युनियर बी अभिषेक बच्चन यांचे खेळाविषयी असलेले प्रेम जगजाहीर आहे. प्रो कबड्डी व इंडियन सुपर फुटबॉल लीगमधील संघांत बच्चन कुटुंबीयांचे मालकी हक्क आहेत. त्यामुळे प्रो कबड्डी आणि आयएसएलच्या सामन्यांना बच्चन कुटुंबीय आवर्जुन हजेरी लावतात आणि याची प्रचिती अनेकदा आली आहे. फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही बिग बी रशियात दाखल झाले होते. त्याशिवाय इंडियन प्रीमिअरच्या सामन्यांनाही ते उपस्थित असतात. 'बिग बी' यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचे मालकी हक्क विकत घेण्यासाठी बच्चन कुटुंबीयांनी उत्सुकता दाखवल्याचा दावा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे.
बच्चन कुटुंबीयांनी सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जच्या मालकी हक्कासाठी प्रयत्न केले होते, परंतु त्यानंतर त्यांनी एक वेळेचा विजेत्या राजस्थान रॉयल्सकडे मोर्चा वळवला. ''हो हे खरे आहे. अभिषेक बच्चनने काही दिवसांपूर्वी मनोज बदले यांची लंडन येथे भेट घेतली,''अशी माहिती एबी कोर्पचे सीईओ रमेश पुलापाका यांनी दिली. गत आठवड्यात वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार राजस्थान रॉयल्स त्यांची संघाचा निम्मा मालकी हक्क विकण्याच्या तयारीत आहेत आणि बच्चन कुटुंबीयांनी ते खरेदी करण्याची उत्सुकता दाखवली आहे.
बच्चन कुटुंबीयांनी रॉयल्सची मालकी हक्क खरेदी केल्यात ते दुसरे बॉलिवूड सेलेब्रिटी ठरणार आहेत. याआधी शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याकडे रॉयल्सचे मालकी हक्क होते. सध्या बच्चन कुटुंबीयांकडे आयएसएलमधील चेन्नईयन एफसी आणि प्रो कबड्डी लीगमधील जयपूर पिंक पँथर्स यांची मालकी आहे.