बंगळुरू, आयपीएल 2019 : भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. इंडियन प्रीमिअर लीग सुरू होण्यापूर्वीही गंभीरने कॅप्टन कोहलीवर टीका केली होती. त्यात रविवारी भर पडली. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाला सलग पाच सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यामुळे प्ले ऑफमधील त्याच्या संघाच्या प्रवेशाचा मार्ग खडतर झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गंभीर म्हणाला,'' विराट कोहली फलंदाज म्हणून मास्टर आहे, परंतु कर्णधार म्हणून तो नवशिका आहे. त्याला अजून बरेच काही शिकण्याची गरज आहे.''
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 205 धावा करूनही बंगळुरूला पराभव पत्करावा लागला. त्यावर गंभीर म्हणाला,''या पराभवाचे खापर गोलंदाजांवर फोडण्यापेक्षा कोहलीनं स्वतः जबाबदारी घ्यायला हवी. मोहम्मद सिराजचे षटक पूर्ण करण्यासाठी मार्कस स्टॉइनिसऐवजी पवन नेगीला आणायला हवे होते. नेगीनं त्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती.''
याआधी गंभीरने गौतम विराट कोहली हा ‘मुत्सद्दी कर्णधार’ वाटत नाही, अशी टीका केली होती. आपल्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) 2012 व 2014 मध्ये जेतेपद पटकावून देणाऱ्या गंभीरने कोहली नशिबवान असल्याचे म्हटले आहे. गंभीर म्हणाला,''मी त्याला मुत्सद्दी कर्णधार मानत नाही. कारण त्याने आयपीएल जिंकलेले नाही. कामगिरी चांगली असलेला कर्णधारच चांगला कर्णधार ठरू शकतो. आयपीएलमध्ये असे कर्णधार आहे की, ज्यांनी संघाला तीनदा जेतेपद मिळवून दिलेले आहे. त्यामुळे कोहलीला अजुनही मोठी वाटचाल करायची आहे.''