नवी दिल्ली, आयपीएल २०१९ : यंदाच्या आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग होत असल्याचा आरोप ललित मोदीने केला होता. या आरोपावर बीसीसीआयने आपले स्पष्टीकरण दिले आहे. हे स्पष्टीकरण देताना बीसीसीआयने पंतच्या व्हिडीओबाबतही काही गोष्टी सांगितल्या आहेत.
बीसीसीआयने या व्हीडीओबाबत खुलासा केला आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की, " सोशल मीडियावर जो व्हिडीओ दाखवला जात आहे तो अपूर्ण आहे आणि हेच दुर्देव आहे. पंतने या वाक्यापूर्वी नेमके काय म्हटले आहे, हे या व्हीडीओमध्ये दाखवण्यात आलेले नाही. ती गोष्ट कुणीही ऐकलेली नाही. चौकार वाचवण्यासाठी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर हा ऑफ साइडवर क्षेत्ररक्षक वाढवण्यासाठी सांगत असल्याचे या व्हीडीओमध्ये कळत आहे. "
आपल्या या स्पष्टीकरणामधून बीसीसीआयने मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळले आहे. या व्हिडीओची सत्यता कुणीही पडताळून पाहिलेली नाही. त्यामुळे हा व्हिडीओमध्ये सत्यता आहे की कुणी हा व्हिडीओ जाणून बुजून वायरल केला आहे, याबाबतही कोणती गोष्ट पुढे आलेली नाही.
नेमके प्रकरण काय...
आयपीएल ही कल्पना ज्यांच्या डोक्यातून आली त्या ललित मोदीने आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग असल्याचे वक्तव्य केले आहे. मोदीने याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आयपीएलमध्ये फिक्संग होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामधील सामन्याचा त्यांनी दाखला आपल्या ट्विटमध्ये दिला आहे. या सामन्यातील एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट करत त्यावर कमेंट लिहिली आहे. हा व्हिडीओ कोलकाता फलंदाजी करत असतानाचा आहे. कोलकाताचा फलंदाज रॉबिन उथप्पा हा फलंदाजी करत आहे. तर नेपाळचा संदीप लामिचाने हा गोलंदाजी करत आहे. उथप्पा आपला पहिला चेंडू खेळण्यापूर्वी दिल्लीचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा एक कमेंट करतो आणि या कमेंटमधूनच मॅच फिक्संगचा वास येत असल्याचे मोदीला दाखवून द्यायचे आहे.
उथप्पा फलंदाजीला तयार होण्यापूर्वी पंत, या चेंडूवरही चौकार बसणार आहे, असे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. चेंडू टाकल्यावर उथप्पानेही चौकार मारल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे चेंडू टाकण्यापूर्वी पंतला या चेंडूवर चौकार आहे, हे कसे समजले, असा सवाल मोदीने उपस्थित केला आहे.
मोदीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " हा जोक आहे कींवा या साऱ्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. आयपीएल, बीसीसीआय, आयसीसी या साऱ्यांना कधी जाग येणार आहे. अधिकाऱ्यांनाही या गोष्टीची काळजी नसावी, हे लाजीरवाणे आहे."