मुंबई, आयपीएल 2018 : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने बाजी मारली. अंतिम फेरीत मुंबईने अखेरच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले. मुंबईचे हे चौथे जेतेपद ठरले. सामन्यानंतर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी मुंबई इंडियन्सला जेतेपदाची ट्रॉफी दिली. या गोष्टीनंतर खऱ्या वादाला सुरुवात झाली, असे म्हटले जाते.
कारण यावेळी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एड्युल्जीही उपस्थित होत्या. त्यांनी मुंबईच्या संघाला जेतेपदाचा धनादेश दिला. पण त्यांना मात्र मुंबई इंडियन्सला जेतेपदाची ट्रॉफी देता आली नाही. यानंतर डायना यांनी बीसीसीआयवरील अधिकाऱ्यांवर आगपाखड केली आहे. त्यानंतर बीसीसीआयमधील वातावरण चांगलेच तापल्याचे म्हटले जात आहे.
यावेळी महिलांचीही आयपीएल स्पर्धा झाली. या लीगच्या अंतिम फेरीतील विजेत्या संघाला डायना यांनीच जेतेपदाचा चषक दिला होता. आता पुरुषांच्या आयपीएलमध्येही आपल्याला जेतेपदाची ट्रॉफी देण्याचा सन्मान मिळेल, असे डायना यांना वाटले होते. पण तसे घडले नाही.
जेतेपदाची ट्रॉफी ही बीसीसीआयचे अध्यक्षच देतात, असे काही जणांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सामन्यांनाही त्यांची उपस्थिती असते आणि त्यांच्याकडून पारितोषिक दिले जाते, असे म्हटले जाते. त्यामुळे काही जणांच्या मते खन्ना यांनीच जेतेपदाची ट्रॉफी देणे योग्य असल्याचे म्हटले आहे. पण डायना यांनी मात्र यावर आक्षेप घेत, एक उदाहरण सर्वांपुढे ठेवले आहे.
डायना म्हणाला की, " भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका काही दिवसांपूर्वी खेळवण्यात आली. यावेळी जेतेपदाची ट्रॉफी देण्याचा अधिकार खन्ना यांचा असल्याचे म्हटले गेले होते. पण खन्ना यांनी या गोष्टीचा अनादर केला आणि त्यांनी जेतेपदाची ट्रॉफी मात्र दिली नाही. त्यामुळे आता आयपीएलच्यावेळी प्रशासकीय समितीच्या सदस्यांना जेतेपदाची ट्रॉफी देण्याचा अधिकार द्यायला हवा होता. "