नवी दिल्ली, आयपीएल 2019 : एखाद्या खेळाडूची गुणवत्ता पाहावी. त्याला संघात घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी, पण तो खेळाडूंच स्पर्धेत खेळू नये. हा दैवदुर्विलास घडला आहे तो किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाबरोबर. कारण त्यांनी एका खेळाडूसाठी जवळपास साडे आठ कोटी रुपये मोजले, पण त्या खेळाडूला आता आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. त्यामुळे पंजाबला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. हा खेळाडू नेमका कोण आहे, तुम्हाला माहिती आहे का...
पंजाबचा आज सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध मोहाली येथे होणार आहे. मोहाली येथे झालेल्या गेल्या सामन्यात पंजाबला पराभव पत्करावा लागला होता. हा मोहालीमधील पंजाबचा यंदाच्या मोसमातील पहिला पराभव होता. आता मोहालीतील दुसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघात काही बदल पाहायला मिळतील. पण त्यांनी ज्या खेळाडूसाठी जवळपास साडे आठ कोटी रुपये मोजले, त्या खेळाडूला आता आयपीएल खेळता येणार नाही.
पंजाबने या महागड्या खेळाडूला आपल्या संघात 27 मार्चला झालेल्या सामन्यात संधी दिली होती. पंजाबचा हा सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध होता. या सामन्यात या मागड्या खेळाडूने 35 धावा देत एक बळी मिळवला होता. या सामन्यात त्याने कोलकाताचा धडाकेबाज सलामीवीर सुनील नरिनला बाद केले होते. त्यानंतर या खेळाडूला एकही सामना खेळता आलेला नाही. कारण यानंतर पंजाबचा सामना चेन्नई सुपर किंग्स या संघाबरोबर होणार होता. पण या सामन्यापूर्वी या खेळाडूच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीमध्ये बोटाला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला यापुढील आयपीएलच्या सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.
पंजाबचा हा खेळाडू आहे वरूण चक्रवर्ती. वरूण हा युवा फिरकीपटू आहे. स्थानिक सामन्यांमध्ये वरुणने चांगली चमक दाखवली होती. त्यामुळे पंजाबने 8.4 कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतले होते. आता वरुणच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्याला जवळपास एक ते दीड महिना खेळता येणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे वरुण यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे.