मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांनी पुरेशी विश्रांती मिळायला हवी, अशी इच्छा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली होती. त्याची ही इच्छा पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यानुसार भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमरा याला विश्रांती देण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करत असून त्याचा थेट फटका इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ मुंबई इंडियन्सला बसणार आहे.
भारतीय संघातील जलदगती गोलंदाजांवर किती भार पडणार आहे, याबाबतचा डाटा बीसीसीआयने मागवला आहे. त्यानंतर 25 वर्षीय बुमराला विश्रांती देण्याच्या मुद्यावर मुंबई इंडियन्सची चर्चा करणार असल्याचेही बीसीसीआयने सांगितले. वर्ल्ड कप स्पर्धेसाठु बुमरा तंदुरूस्त राहावा म्हणून बीसीसीआय काळजी घेत आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''विराटने व्यक्त केलेली चिंता रास्त आहे. कदाचित तोही आयपीएलच्या काही सामन्यांतून विश्रांती घेऊ शकतो. तो त्याबद्दल संघामालकांशी बोलतही असेल. बुमराबद्दल बोलायचे झाले तर, सहाय्यक स्टाफला आम्ही त्याच्यावर असलेल्या कामगिरीच्या जबाबदारीचा डाटा तयार करायला सांगितला आहे. त्यानंतर आम्ही मुंबई इंडियन्सशी चर्चा करणार आहोत.''ते पुढे म्हणाले,''तो तंदुरुस्त असेल, तर मुंबई इंडियन्ससाठी तो काही महत्त्वाचे सामने खेळू शकतो. आयपीएलचे वेळापत्रक प्रचंड पळापळीचे असते. वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून मुंबई इंडियन्सनेच त्याला विश्रांती दिली तर ते उत्तम ठरेल.''
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर वन डे मालिका आणि न्यूझीलंड दौरा असे भारतीय संघाचे वेळापत्रक आहे. आयपीएल संपल्यानंतर त्वरित वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होत आहेत. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे.