हैदराबाद, आयपीएल 2018 : आयपीएलचा ज्वर चांगलाच चढला आहे. आता ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यत चांगलीच रंगत आहे. पण यंदाच्या हंगामात एका गोलंदाजांची जोरदार धुलाई झाली असून तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.
सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात फिरकीपटू मुजीब उर रेहमानने चार षटकांमध्ये तब्बल 66 धावा दिल्या. आपल्या चार षटकांमध्ये मुजीबने अनुक्रमे 10, 18, 12 आणि 26 धावा दिल्या. यंदाच्या हंगामातील एका गोलंदाजाने चार षटकांमध्ये दिलेल्या या सर्वात जास्त धावा ठरल्या आहेत. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम हा बासिल थम्पीच्या नावावर आहे. थम्पीने 2018 साली झालेल्या आयपीएलच्या एका सामन्यात 70 धावा दिल्या होत्या. त्यानंतर या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर इशांत शर्मा आहे. आयपीएलच्या 2013च्या हंगामामध्ये इशांतने एका सामन्यात 66 धावा दिल्या होत्या.
डेव्हिड वॉर्नरची भन्नाट खेळी आणि गोलंदाजांच्या चांगल्या माऱ्यामुळे सनरायर्स हैदराबादला किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवता आला. या विजयासह हैदराबादचे 12 गुण झाले आहेत. हैदराबादने हा सामना 45 धावांनी जिंकला. लोकेश राहुलने पंजाबचा एकहाती किल्ला लढवला, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. राहुलने 56 चेंडूंत 79 धावांची खेळी साकारली.
हैदराबादच्या 213 या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची चांगली सुरुवात झाली नाही. पण लोकेश राहुलने मात्र एका बाजूने किल्ला लढवला. राहुलने अर्धशतक पूर्ण करत संघाचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रय्तन केला होता. पण त्याला अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ न लाभल्यामुळे पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला.
आपल्या आयपीएलच्या अखेरच्या सामन्यातही सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तळपल्याचे पाहायला मिळाले. आपल्या धडाकेबाज 81 धावांच्या खेळीच्या जोरावर वॉर्नर आयपीएलला अलविदा करणार आहे. वॉर्नरच्या तुफानी खेळीच्या जोरावर हैदराबादला 212 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
पंजाबने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. हैदराबादच्या सलामीवीरांनी या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी चार षटकांमध्येच संघाचे अर्धशतक पूर्ण केले. पण साहाला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. साहाला 18 धावांवर असताना मुरुग्गन अश्विनने बाद केले.
साहा बाद झाल्यावर वॉर्नरची मनीष पांडेबरोबर चांगलीच जोडी जमली. या दोघांनी संघाला 160 धावांपर्यंत मजल मारून दिली. पण त्यानंतर फक्त तीन धावांमध्ये हे दोघेही फलंदाज बाद झाले. वॉर्नरने यावेळी 56 चेंडूंत 81 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीमध्ये वॉर्नरने सात चौकार आणि दोन षटकार लगावले.