मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल) पडघम वाजू लागले आहेत. भारतीय संघात एकजूटीने खेळणारे खेळाडू आयपीएलमध्ये एकमेकांना आव्हान देण्यासाठी सज्ज होत आहेत. पण, याची प्रचिती आतापासूनच येत आहे युवा यष्टिरक्षक रिषभ पंतने काही दिवसांपूर्वी भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चॅलेंज केले होते. त्यामुळे कॅप्टन कूल धोनी त्यावर काय प्रतिक्रीया देतो, याची सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर पंतचे आव्हान स्वीकारत धोनीनं त्याला मोलाचा सल्ला दिला.
भारतीय क्रिकेट संघात धोनीचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. पंतनेही अल्पावधीतच सातत्यपूर्ण कामगिरी करून संघातील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत पर्यायी यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिकऐवजी पंतची निवड करण्यात आलेली आहे. वर्ल्ड कप संघातही धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून पंतच्याच नावाचा विचार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच पंतने थेट माहीला चॅलेंज दिले होते. पंतने एक व्हिडीओ ट्विट करून थेट धोनीला आव्हान केले होते.
तो म्हणाला,'' माही भाई हे मला गुरू समान आहेत. तो नसता तर मी यष्टिरक्षक-फलंदाज झालो नसतो. पण, यावेळी त्याच्या संघाविरुद्ध मी अशी फटकेबाजी करेन की, कॅप्टन कूल माही कूल राहणार नाही. माही भाई तयार राहा, खेळ दाखवायला येत आहे.''