मुंबई, आयपीएल २०१९ : आतापर्यंत धडाधड चालणारी चेन्नई एक्सप्रेस अखेर मुंबई इंडियन्सने रोखली. आतापर्यंत चेन्नईने तिन्ही सामन्यांत विजय मिळवला होता. पण चौथ्या सामन्यात त्यांना मुंबईने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १७० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 133 धावा करता आल्या. मुंबईने हा सामना ३७ धावांनी जिंकला. मुंबईकडून सुर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले, तर हार्दिक पंड्याने दमदार अष्टपैली कामिगरी केली. मुंबईचा हा दुसरा विजय, तर चेन्नईचा पहिला पराभव ठरला. मुंबईचा हा आयपीएलमधील शंभरावा विजय ठरला.
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईने पहिल्या दोन षटकांत आपले दोन्ही सलामीवीर गमावले. सुरेश रैनाचा अप्रतिम झेल किरॉन पोलार्डने पकडला. चेन्नईची ३ बाद ३३ अशी अवस्था होती. त्यानंतर धोनी आणि केदार जाधव यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. पण धोनीला यावेळी १२ धावांवर समाधान मानावे लागले. हार्दिक पंड्याने धोनीला बाद केले. धोनी बाद झाल्यावर केदारने आपले अर्धशतक झळकावले.
चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि त्याची कृणाल पंड्याबरोबरच्या भागीदारीमुळे मुंबईला ही सन्मानजक धावसंख्या उभारता आली. मुंबईचा डाव यावेळी सूर्यकुमार यादवने सावरला. त्याने ४३ चेंडूंत आठ चौकार आणि एक षटकार लगावत ५९ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्याबरोबर अखेरच्या दोन षटकांमध्ये हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्ड यांनी ४५ धावा कुटल्या. हार्दिकने आठ चेंडूंत नाबाद २५ आणि पोलार्डने सात चेंडूंमध्ये नाबाद नाबाद १७ धावा फटकावल्या.
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला, पण त्यांना आश्वासक सुरुवात करता आली नाही. क्विंटन डी'कॉकच्या रुपात मुंबईला पहिला धक्का बसला. क्विंटन डी'कॉकला चार धावा करता आल्या. त्यानंतर रोहित शर्माही काही वेळात बाद झाला, त्याने १३ धावा केल्या. .युवराज सिंगही यावेळी चार धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंड्या यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला सावरले. पंड्याने ३२ चेंडूंत ४२ धावा केल्या.