चेन्नई, आयपीएल 2019 : लुंगी एंगीडीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या आणखी एका खेळाडूनं इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. सलग दोन सामने जिंकून विजयरथावर स्वार असलेल्या कॅप्टन कूल धोनीची चिंता वाढली आहे. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड व्हिलीनं मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिलीच्या पत्नीनं दुसऱ्या मुलाला जन्म दिला आणि त्यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले. तो आता आयपीएलच्य संपूर्ण सत्रात खेळणार नाही.
चेन्नईने आयपीएलच्या 12व्या सत्रासाठी आठ परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले होते आणि व्हिली हा त्यापैकी एक आहे. इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूला गतवर्षी केदार जाधवच्या जागी करारबद्ध केले होते आणि 2019च्या लिलावात चेन्नईने त्याला कायम राखले. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज एंगीडीला दुखापतीमुळे आधीच माघार घ्यावी लागली होती. त्याची उणीव जाणवत असल्याची कबुली कॅप्टन धोनीनं दिली होती. त्यात व्हिलीच्या जाण्यानं चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.
व्हिली म्हणाला की,''हा निर्णय घेणे अवघड होता, परंतु तोच योग्य आहे. माझी पत्नी सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. त्यामुळे यावेळी तिच्यासोबत माझे असणे महत्त्वाचे आहे. चेन्नईच्या संघाने माझा हा निर्णय मान्य केला आहे आणि मला सहाकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. क्रिकेटपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. कुटुंबातील व्यक्ती आनंदी तरच मी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करू शकतो.''
चेन्नई सुपर किंग्सने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यांनी उद्धाटनीय सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सात विकेट राखून विजय मिळवला. चेन्नईच्या गोलंदाजांनी बंगळुरूचा संपूर्ण संघ 70 धावांत माघारी पाठवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात चेन्नईने यजमान दिल्ली कॅपिटल्सचे 148 धावांचे लक्ष्य 6 विकेट्स राखून सहज पूर्ण केले. चेन्नईचा तिसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध घरच्या मैदानावर होणार आहे. राजस्थानला आपल्या दोन्ही सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे विजयी हॅटट्रिक साजरी करण्याचे लक्ष्य असणार आहे.
Web Title: IPL 2019: Chennai Super kings all rounder David Willey pulls out of IPL 2019
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.