मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या हंगामाला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात उद्धाटनीय सामना होणार आहे. लोकसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा दोन टप्प्यात केली. पहिल्या टप्प्यात 17 सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर बीसीसीआयनं मंगळवारी साखळी गटातील सर्व सामन्यांचे स्थळ व वेळ जाहीर केली. पण, प्ले-ऑफ व अंतिम फेरीबाबत अजूनही गुढ कायम आहे.
''मतदानाच्या तारखांच्या नजीक आयपीएलचा सामना असणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. त्यानुसारच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईत 29 एप्रिलला मतदान होणार आहे आणि त्यामुळे 6 एप्रिल ते 2 मे या कालावधीत तेथे सामना खेळवण्यात येणार नाही.