जयपूर, आयपीएल 2019 : धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आता विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत येऊन बसला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर असलेल्या गेलने आयपीएलमधल्या चार हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा रैना आघाडीवर आहे. रैनाने 177 सामन्यांत 5004 धावा केल्या आहेत आणि आयपीएलमध्ये 5000 धावा प्रथम करण्याचा मानही रैनाने पटकावला आहे. या क्रमवारीत रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा कोहली (4954), मुंबई इंडियन्सचा शर्मा ( 4507), दिल्ली कॅपिटल्सचा गंभीर ( 4217), कोलकाता नाइट रायडर्सचा उथप्पा ( 4121), दिल्ली कॅपिटल्सचा धवन ( 4101), सनरायझर्स हैदराबादचा वॉर्नर ( 4099) आणि चेन्नई सुपर किंग्सचा धोनी ( 4016) यांचा क्रमांक येतो.
या सामन्यापूर्वी गेलच्या नावावर 112 सामन्यांत 3994 धावा होत्या. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत गेलने 4 सामन्यांत 106 च्या सरासरीने 424 धावा कुटल्या होत्या. या मालिकेत त्याने 20 चौकार व 39 षटकार खेचले होते. त्याचा हाच फॉर्म आयपीएलमध्येही पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आयपीएलमध्ये गेलच्या नावावर सहा शतकं आणि 24 अर्धशतकं आहेत.
ख्रिस गेल सर्वात मस्तीखोर, सांगतोय लोकेश राहुल
कॉफी विथ करण या कार्यक्रमात वादग्रस्त विधान करून लोकेश राहुल अडचणीत सापडला होता. पण अजूनही त्याच्या बोलण्यात गंभीरता आलेली दिसत नाही. आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वीच राहुलने 'मस्ती'वर एक विधान केले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात राहुलला ख्रिस गेलसारखा पार्टनर मिळाला आहे. त्यामुळे राहुलच्या वागण्यात बदल झाल्याचे म्हटले जात आहे.
पहिल्या सामन्यापूर्वी राहुल म्हणाला की, " ड्रेसिंग रुममध्ये ख्रिस गेल हा सर्वात मस्तीखोर आहे. त्याचे वय जास्त असले तरी त्याच्यामध्ये भरपूर उर्जा आहे. त्याबरोबर बरेच सामने मी खेळलो आहे. त्याच्याकडून मी बरेच काही शिकलो आहे. गेल हा संघात सर्वात अनुभवी खेळाडू असला तरी त्याची मस्ती पाहून आम्हाला रीलॅक्स व्हायला मदत होते."