जयपूर, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलही चांगल्या फॉर्मात आहे आणि तो पंजाबचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्मिथच्या पुनरागमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पण, आजचा सामना गेलसाठी विशेष असणार आहे. आजच्या सामन्यात सहा धावा करताच गेल आयपीएलमध्ये सुरेश रैना, विराट कोहली, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, रॉबीन उथप्पा, गौतम गंभीर, शिखर धवन आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा रैना आघाडीवर आहे. रैनाने 177 सामन्यांत 5004 धावा केल्या आहेत आणि आयपीएलमध्ये 5000 धावा प्रथम करण्याचा मानही रैनाने पटकावला आहे. या क्रमवारीत रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा कोहली (4954), मुंबई इंडियन्सचा शर्मा ( 4507), दिल्ली कॅपिटल्सचा गंभीर ( 4217), कोलकाता नाइट रायडर्सचा उथप्पा ( 4121), दिल्ली कॅपिटल्सचा धवन ( 4101), सनरायझर्स हैदराबादचा वॉर्नर ( 4099) आणि चेन्नई सुपर किंग्सचा धोनी ( 4016) यांचा क्रमांक येतो.
या सर्व खेळाडूंनी 4000 पेक्षा अधिक धावा केल्य आहेत आणि या पंक्तीत येण्यासाठी गेलला 6 धावांची गरज आहे. गेलच्या नावावर 112 सामन्यांत 3994 धावा आहेत. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत गेलने 4 सामन्यांत 106 च्या सरासरीने 424 धावा कुटल्या होत्या. या मालिकेत त्याने 20 चौकार व 39 षटकार खेचले होते. त्याचा हाच फॉर्म आयपीएलमध्येही पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आयपीएलमध्ये गेलच्या नावावर सहा शतकं आणि 24 अर्धशतकं आहेत.
वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेनंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा गेलने नुकतीच केली होती. 30 मे पासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत असून ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे खेळवण्यात येणार आहे.
Web Title: IPL 2019: Chris Gayle six runs away from joining Suresh Raina, Virat Kohli, MS Dhoni in elite list
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.