मोहाली, आयपीएल २०१९ : किंग्ज इलेव्हन पंजाबने ख्रिस गेलऐवजी सॅम कुरमला संधी दिली आणि या युवा खेळाडूने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. या सामन्यात हॅट्ट्रिकसह चार बळी मिळवत कुरन हा पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कुरन हा फक्त २० वर्षांचा असला तरी त्याच्या 'DNA'मध्येच आहे क्रिकेट असल्याचे पाहायला मिळाले आहे.
सॅमने काही महिन्यांपूर्वीच इंग्लंडकडून पदार्पण केले. सॅम हा इंग्लंडकडून खेळत असला तरी त्याचे वडिल मात्र झिम्बाब्वेकडून खेळले आहेत. केव्हिन कुरन हे झिम्बाब्वेच्या संघातील माजी अष्टपैलू खेळाडू आहे. सॅमचा मोठा भाऊ टॉम हादेखील इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे सॅमच्या पूर्ण कुटुंबामध्ये क्रिकेट असल्याचेच पाहायला मिळत आहे.
रिषभ पंत ( 39) आणि कॉलीन इंग्राम ( 38) यांच्या 62 धावांच्या भागीदारीनंतरही दिल्ली कॅपिटल्सला सामना गमवावा लागला. 21 चेंडूंत 24 धावांची गरज असताना दिल्लीचे सात फलंदाज शिल्लक होते, परंतु तरीही किंग्स इलेव्हन पंजाबने 14 धावांनी सामना जिंकला. दिल्लीचे 7 फलंदाज अवघ्या 17 चेंडूंत 8 धावा करून माघारी परतले. मोहम्मद शमी ( 2/27) आणि सॅम कुरन ( 4/11) यांनी अखेरच्या षटकांत टिच्चून मारा केला. कर्णधार रवीचंद्रन अश्विन यानेही दोन विकेट घेतल्या. पण, कुरनने घेतलेली हॅटट्रिक या सामन्यात चर्चेचा विषय ठरली. या कामगिरीसह कुरनने अनेक विक्रम मोडले आणि काहींशी बरोबरीही केली. पण, एका बाबतीत त्याने भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि सध्या मुंबई इंडियन्सच्या चमूत असलेल्या युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली. युवराजने 2009 मध्ये केलेल्या एका विशेष विक्रमाची पुनरावृत्ती कुरनने सोमवारच्या सामन्यात केली.
आयपीएलच्या एकाच सामन्यात सलामीला फलंदाजी आणि हॅटट्रिक हा योगायोग दहा वर्षांनी जुळून आला. सॅन कुरनने सोमवारच्या सामन्यात सलामीला फलंदाजी केली आणि हॅटट्रिक केली. याआधी युवराज सिंगने 2009 मध्ये पंजाबकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध असा पराक्रम केला होता.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कुरनने 2.2 षटकांत 11 धावा देत 4 फलंदाज बाद केले. आयपीएलमधील पंजाबच्या गोलंदाजाने नोंदवलेली ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. या क्रमवारीत अंकित रजपूत ( 5/14 वि. सनरायझर्स हैदराबाद, 2018) आणि मास्केरेन्हास ( 5/25 वि. पुणे वॉरियर्स इंडिया, 2012) हे आघाडीवर आहेत. 3 बाद 144 धावांवरून दिल्ली कॅपिटल्सचा संघ 152 धावांत तंबूत परतला. आयपीएल इतिहासात सात विकेट 8 धावांत आणि 17 चेंडूत पडण्याची ही पहिलीच आणि लाजीरवाणी घटना आहे.
दिल्लीचे पाच फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. आयपीएलमधील ही दुसरी लाजीरवाणी कामगिरी ठरली. दिल्लीच्या पृथ्वी शॉ, ख्रिस मॉरिस, हर्षल पटेल, कागिसो रबाडा व संदीप लामिछाने हे शून्यावर बाद झाले. याआधी कोची टस्कर्सचे सहा फलंदाज डेक्कन चार्जर्सविरुद्ध भोपळा न फोडता माघारी परतले होते.