चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या मोसमाला शनिवारी सुरुवात झाली. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने विजयी सलामी देताना रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूचा धुव्वा उडवला. हरभजन सिंग, इम्रान ताहीर आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीनं बंगळुरूचा डाव 70 धावांत गुंडाळला आणि चेन्नईने हे माफक लक्ष्य सहज पार केले. नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं संथ खेळपट्टी पाहून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भज्जी, ताहीर आणि जडेजाने योग्य ठरवला. बंगळुरूच्या पार्थिव पटेलला दुहेरी धावा करता आल्या आणि उर्वरित दहा फलंदाज एकेरी धावेत माघारी परतले. चेन्नईने 17.4 षटकांत 71 धावा करताना विजयी सलामी दिली. अंबाती रायुडूने 42 चेंडूंत 28 धावा केल्या.
मात्र, या विजयानंतर 'कॅप्टन कूल' धोनी प्रचंड संतापलेला दिसला. त्याने चेपॉकच्या खेळपट्टीवर नाराजी प्रकट केली आणि पुढील सामन्यात खेळपट्टी बदलण्याची मागणी केली. 37 वर्षीय धोनी म्हणाला,''या खेळपट्टीचा मलाही अंदाज नव्हता. आम्ही या खेळपट्टीवर सराव केला होता आणि या सामन्यात मोठी धावसंख्या होईल, असे आम्हाला वाटले होते. पण, सराव सामन्यात आम्ही प्रत्यक्ष सामन्यापेक्षा 30 धावा अधिक केल्या होत्या. त्यामुळे या खेळपट्टीने आम्हालाही आश्चर्यचकीत केले. या खेळपट्टीत सुधारणा होण्याची गरज आहे. दव असतानाही चेंडू प्रचंड फिरकी घेत होता. 80, 90, 100 धावा ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये खूपच कमी आहे. या पुढील सामन्यात अशी खेळपट्टी आम्हाला नक्कीच नकोय.''
बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनेही खेळपट्टीवर आश्चर्य व्यक्त केले. पण, त्याचवेळी त्याने फलंदाजांच्या अपयशावरही भाष्य केले.
पाच हजार धावा करणारा सुरेश रैना ठरला पहिला फलंदाज
या सामन्यात सुरेश रैना व कोहली यांच्यात प्रथम 5000 धावा करण्याची शर्यत रंगली आणि ती रैनाने जिंकली. आजच्या सामन्यात या दोघांपैकी कोण प्रथम 5000 धावा करणार यासाठी दोघेही आतुर होते. या शर्यतीत बाजी मारण्यासाठी रैनाला 15 धावांची गरज होती, तर कोहलीला 52 धावांची गरज होती. या सामन्यापूर्वी रैनाने 176 सामन्यांत 4985 धावा केल्या होत्या, तर कोहलीने 163 सामन्यांत 4948 धावा केल्या होत्या. या सामन्यात १९ चेंडूंत १५ धावा करत रैनाने ही शर्यत जिंकली. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणार रैना हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
Web Title: IPL 2019: CSK skipper MS Dhoni slams Chepauk pitch despite easy win over RCB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.