विशाखापट्टणम, आयपीएल 2019 : महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या आघाडीच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं एकेक पत्ते बाहेर काढून दिल्लीच्या धावांवर अंकुश ठेवला. कॉलीन मुन्रो आणि रिषभ पंत वगळता दिल्लीच्या फलंदाजांना समाधानकारक कामगिरी करण्यात अपयश आले. दिल्लीला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 147 धावा केल्या.
पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या खेळात आत्मविश्वास दिसला. शार्दूल ठाकूरला सलग तीन चौकार.... शिखर धवनने फटकेबाजी केली. पण, दीपक चहरने दिल्लीला धक्का दिला. त्याने तिसऱ्याच षटकात पृथ्वीला पायचीत केले. त्यानंतर कॉलिन मुन्रोने दिल्लीचा डाव सावरला. त्याने धवनसह चांगली फलंदाजी केली, परंतु पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात फिरकीपटू हरभजन सिंगने धवनला बाद केले. 14 चेंडूंत 18 धावा करून धवन माघारी फिरला. यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीनं त्याचा झेल टिपला. मुन्रो आणि कर्णधार श्रेयस अय्यर ही जोडी चांगला खेळ करेल असे वाटले होते, परंतु रवींद्र जडेजाने ती तोडली. त्याने मुन्रोला ( 27) बाद केले. दिल्लीची 10 षटकांत 3 बाद 68 धावा अशी अवस्था झाली होती.धोनीनं आपला हुकुमी एक्का काढला. इम्रान ताहीरने 12व्या षटकात दिल्लीचा कर्णधार अय्यरला बाद केले. अय्यर 13 धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला अक्षर पटेलही (3) लगेच बाद झाला. ड्वेन ब्राव्होने त्याला बाद केले. ताहीरने दिल्लीच्या फलंदाजांना चांगलेच चकवले. त्याने मोठे फटके मारू दिले नाही. धोनीच्या चाणाक्ष नेतृत्वासमोर दिल्लीच्या फलंदाजांना मुक्तपणे फटकेबाजी करता आली नाही. दिल्लीनं 15 षटकांत पाच विकेट गमावून 93 धावा केल्या होत्या. अखेरच्या पाच षटकांत रुथरफोर्ड आणि रिषभ पंत फटकेबाजी करून दिल्लीला मोठा पल्ला गाठून देतील अशी अपेक्षा होती. रुथरफोर्डने भज्जीच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला, परंतु पाचव्या चेंडूवर भज्जीनं त्याला तंबूत पाठवले. भज्जीनं 4 षटकांत 31 धावांत 2 विकेट घेतल्या. 17व्या षटकात रिषभ पंतने टोलावलेला चेंडू दीपक चहरने झेलला, परंतु तो सीमारेषेबाहेर गेल्याने दिल्लीला षटकार मिळाला. धोनीनं मात्र चहरच्या या कामगिरीवर नाराजी प्रकट केली. पंत एका बाजूनं खिंड लढवत होता, परंतु 19व्या षटकात चहरने त्याला बाद केले. पंतने 25 चेंडूंत 38 धावा केल्या. त्यात 2 चौकार व 1 षटकार खेचला.