चेन्नई, आयपीएल २०१९ : हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांच्या भेदक गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सने पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करून विजयी सलामी दिली. या दोघांच्या अचूक गोलंदाजीमुळे चेन्नईचे बंगळुरुचा ७० धावांत खुर्दा उडाला. बंगळुरुकडून पार्थिव पटेलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला तीन फलंदाज गमवावे लागले आणि सात विकेट्स राखत त्यांनी बंगळुरुला पराभूत केले. या सामन्यानंतर आता विराट कोहलीपेक्षामहेंद्रसिंग धोनीच चांगला कर्णधार आहे, अशी चर्चा रंगत होती.
बंगळुरुचे आव्हान माफक वाटत असले तरी फिरकीला पोषक खेळपट्टीवर चेन्नईला झुंजावे लागले. त्यांनी सलामीवीर शेन वॉटसनला झटपट गमावले. पण त्यानंतर सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांनी संघाचा डाव सावरला. रैनाने यावेळी आयपीएलमधील पाच हजार धावांचा टप्पा गाठला. आयपीएलमध्ये पाच हजार धावा करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने पहिल्याच सामन्यात आपली जादू दाखवत इतिहास रचला आहे. हरभजनने या सामन्यात चार षटकांमध्ये २० धावा देत तीन बळी मिळवले. ताहिरनेही हरभजननंतर अचूक मारा केला. ताहिरने फक्त ९ धावांमध्ये बंगळुरुच्या तीन फलंदाजांना बाद केले.
आयपीएलमध्ये आतापर्यंत स्वत:च्याच गोलंदाजीवर सर्वाधिक झेल पकडणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये हरभजनने अव्वल क्रमांक पटकावला आहे. पहिल्या सामन्यात हरभजनने मोईल अलीचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल पकडला. हरभजनने स्वत:च्याच गोलंदाजीवर हा अकरावा झेल पकडत इतिहास रचला आहे. हा पराक्रम करताना हरभजनने चेन्नईच्याच ड्वेन ब्राव्होला पिछाडीवर टाकले आहे. ब्राव्होने असा पराक्रम दहा वेळा केला होता.
पाच हजार धावा करणारा सुरेश रैना ठरला पहिला फलंदाज
गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर बंगळुरु यांच्यात सलामीचा रंगला. या सामन्याच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे आमनेसामने येणार आहेत आणि त्याचीच सर्वांना अधिक उत्सुकता आहे. पण, या सामन्यात खरी शर्यत रंगली ती कोहली आणि सुरेश रैना यांच्यामध्ये आणि ही शर्यत जिंकली ती सुरेश रैनाने.
या सामन्यात रैना व कोहली यांच्यात सर्वात प्रथम 5000 धावा करण्याची शर्यत रंगली आणि ती रैनाने जिंकली. आजच्या सामन्यात या दोघांपैकी कोण प्रथम 5000 धावा करणार यासाठी दोघेही आतुर होते. या शर्यतीत बाजी मारण्यासाठी रैनाला 15 धावांची गरज होती, तर कोहलीला 52 धावांची गरज होती. या सामन्यापूर्वी रैनाने 176 सामन्यांत 4985 धावा केल्या होत्या, तर कोहलीने 163 सामन्यांत 4948 धावा केल्या होत्या. या सामन्यात १९ चेंडूंत १५ धावा करत रैनाने ही शर्यत जिंकली. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणार रैना हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
Web Title: IPL 2019: CSK win over RCB in opening match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.