कोलकाता, आयपीएल 2019 : डेव्हिड वॉर्नर. जॉनी बेअरस्टो आणि विजय शंकरच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 3 बाद 181 धावा चोपल्या. वॉर्नर व बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना कोलाकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांना हतबल केले. वॉर्नरला पाचव्या षटकात दिलेले जीवदान कोलकाताला महागात पडले. 13व्या षटकात अखेर कोलकाताला पहिले यश मिळाले, पियुष चावलाने हैदराबादच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टोला त्रिफळाचीत केले आणि डेव्हिड वॉर्नरसोबतची 118 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. पण, वॉर्नर थांबला नाही आणि त्याने 85 धावा कुटल्या. या खेळीसह त्याने कोलकाताविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला. वॉर्नर एका बाजूने फटकेबाजी करत होता. त्यानं 31 चेंडूंत 53 धावा करताना आपल्या नावावर दोन विक्रमांची नोंद केली. कोलकाताविरुद्ध 700 पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला. शिवाय आयपीएलमध्ये सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांचा विक्रमही त्यानं नावावर केला. वॉर्नरने 40 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहलीनं 38 वेळा अशी कामगिरी केली आहे. या क्रमवारीत गौतम गंभीर व सुरेश रैना ( 36), रोहित शर्मा ( 35) आणि शिखर धवन ( 32) मागोमाग आहेत.16व्या षटकात वॉर्नरचे वादळ थांबवण्यात कोलकाताला यश आले. आंद्रे रसेलने वॉर्नरला बाद केले. वॉर्नरने 53 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकारांसह 85 धावा कुटल्या. त्यानंतर हैदराबादच्या धावांचा वेग मंदावला. त्यांना 181 धावांवर समाधान मानावे लागले. विजय शंकरने अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी करताना 40 धावा केल्या. वॉर्नरने आजच्या खेळीनंतर कोलकाताविरुद्ध सर्वाधिक 761 धावा केल्या.