हैदराबाद, आयपीएल 2019 : यंदाचा आयपीएलचा हंगाम गाजवला तो सनरायझर्स हैदराबादच्याडेव्हिड वॉर्नरने. कारण आतपर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा वॉर्नरच्याच नावावर आहेत. पण आता यापुढच्या सामन्यांमध्ये वॉर्नर दिसणार नाही. पण आतापर्यंतच्या 12 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करत वॉर्नरने आयपीएलला अलविदा म्हटले आहे. आयपीएलचा निरोप घेताना वॉर्नर भावुक झाला होता. यावेळी वॉर्नरच्या चेहऱ्यावरील भाव एका व्हिडीओमध्ये टिपण्यात आले आहेत.
हा पाहा व्हिडीओ
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने इंडियन प्रीमिअर लीगचे 12वे हंगाम गाजवले. सलग आठ अर्धशतकी खेळी करून त्याने सनरायझर्स हैदराबादच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या या खेळीमुळे हैदराबादच्या प्ले ऑफच्या आशा बळावल्या आहेत. पण, सोमवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेला सामना हा त्याचा आयपीएलमधील अखेरचा ठरला. त्यामुळे संघासोबत पुढील वाटचालीत त्याला हातभार लावता येणार नाही. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी तो ऑस्ट्रेलिया संघाच्या सराव सत्रात सहभागी होण्यासाठी मायदेशात रवाना झाला आहे. अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्याचे समाधान घेत त्याने सहकाऱ्यांचा भावनिक निरोप घेतला आहे. विशेष म्हणजे त्याचा हा भावनिक संदेश संघसहकारी भुवनेश्वर कुमारने शूट केला.
या सामन्यानंतर वॉर्नरने इंस्टाग्रामवरही भावनिक पोस्ट केली. त्याने लिहिले की,''सनरायझर्स हैदराबाद संघाने दिलेल्या पाठींब्याचा मी खूप आभारी आहे. यावर्षीच नाही तर गतवर्षीही त्यांनी मला खचू दिले नाही. या संघाकडून खेळण्यासाठी मला बरीच प्रतीक्षा पाहावी लागली. संघ मालक, साहाय्यक खेळाडू, सहकारी, सोशल मीडिया टीम आणि चाहते या सर्वांचे खूप खूप आभार. त्यांनी दाखवलेल्या विश्वासावर मी खरा उतरलो, याचा आनंद.. पुढील वाटचालीसाठी संघाला शुभेच्छा.''
डेव्हिड वॉर्नरची भन्नाट खेळी आणि गोलंदाजांच्या चांगल्या माऱ्यामुळे सनरायर्स हैदराबादला किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवता आला. या विजयासह हैदराबादचे 12 गुण झाले आहेत. हैदराबादने हा सामना 45 धावांनी जिंकला. लोकेश राहुलने पंजाबचा एकहाती किल्ला लढवला, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. राहुलने 56 चेंडूंत 79 धावांची खेळी साकारली.
हैदराबादच्या 213 या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची चांगली सुरुवात झाली नाही. पण लोकेश राहुलने मात्र एका बाजूने किल्ला लढवला. राहुलने अर्धशतक पूर्ण करत संघाचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रय्तन केला होता. पण त्याला अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ न लाभल्यामुळे पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला.
आपल्या आयपीएलच्या अखेरच्या सामन्यातही सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तळपल्याचे पाहायला मिळाले. आपल्या धडाकेबाज 81 धावांच्या खेळीच्या जोरावर वॉर्नर आयपीएलला अलविदा करणार आहे. वॉर्नरच्या तुफानी खेळीच्या जोरावर हैदराबादला 212 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.